गौतम बचुटे
केज : केज पोलिसांच्या पथकाने गोवंशीय प्राणी आणि इतर प्राणी यांचे कत्तल केलेले हाडे यांची वाहतूक करणारा टेम्पो ताब्यात घेतला आहे. या बाबतची माहिती अशी की, दि. ६ जुलै रोजी पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांना गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की, बीड कडून विडा-शिंदी मार्गे एक आयशर टेम्पो क्रं. (एम एच-१२/एच डी-३३४८) येत असून त्या टेम्पो मधून प्रचंड दुर्गंधी येत आहे. त्यात काही तरी संशयित असावे.
अशी माहिती मिळताच पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक, संदीप मांजराने, पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम, पोलिस निरीक्षक इनामदार, यांना कारवाईचे आदेश दिले. स्वतः पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, संदीप मांजराने, पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम, पोलिस निरीक्षक इनामदार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक चव्हाण, शंभुदेव दराडे, सानप, शिवाजी गित्ते, संतोष गित्ते, गोरख फड यांनी सापळा लावून सदर टेम्पो शिंदी परिसरात अडविला.
पंचासमक्ष पोलीसांनी त्या टेम्पोची पाहणी केली असता त्या मध्ये गोवंशीय प्राणी आणि कत्तल केलेल्या प्राण्यांच्या हाडांना चिकटलेले मांस व हाडे असल्याचे आढळून आले. पोलिसांनी दुर्गंधीयुक्त हाडांची विल्हेवाट लाऊन सदर वाहन पोलीस ठाण्यात आणले आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे यांच्या फिर्यादी वरून ट्रक चालक यांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात प्राण्याचा छळ प्रतीबंधक अधिनीयम १९६० चे कलम आणि महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनीयम १९७६ कलम यासह महाराष्ट्र पोलीस अधिनीयम प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.