Rabi Season Water Release pudhari photo
बीड

Beed News : पैठण उजव्या कालव्याला ५ नोव्हेंबरपासून पाणी सुटणार

रब्बी हंगामासाठी तीन आवर्तने मंजूर; आ.पंडित यांच्या पाठपुराव्याला यश

पुढारी वृत्तसेवा

गेवराई : जायकवाडी धरणाच्या पैठण उजवा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत रब्बी हंगामासाठी तीन आवर्तने देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, पहिली पाणीपाळी दि. 5 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. माजी आमदार अमरसिंह पंडित आणि विद्यमान आमदार विजयसिंह पंडित यांनी यासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. या निर्णयामुळे गेवराई विधानसभा मतदारसंघातील शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, मतदारसंघातील शेतकरी व जनतेकडून आभार मानले जात आहेत.

जायकवाडी धरणाच्या पैठण उजवा कालवा सल्लागार समितीची बैठक आज छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. भीषण दुष्काळ आणि तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आयोजित या बैठकीत पाणी नियोजनासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.

या बैठकीत रब्बी हंगामासाठी चार आणि उन्हाळी हंगामासाठी दोन आवर्तने देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी रब्बी हंगामासाठी तीन आवर्तने देण्याची मागणी मान्य करण्यात आली असून, पहिली पाणीपाळी 5 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. यामुळे रब्बी हंगामातील पिकांना पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

दुष्काळ व पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता गोदावरी नदीपात्रातील सर्व बॅरेज एप्रिल महिन्यात पाण्याने भरून देण्याची मागणी करण्यात आली.पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन बॅरेजमध्ये पाणी सोडण्यासही मान्यता देण्यात आली. सध्या जायकवाडी धरणात 74 टक्के म्हणजेच सुमारे 58 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असून, या पाण्याचा नियोजनबद्ध वापर करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

  • माजी आमदार अमरसिंह पंडित आणि विद्यमान आमदार विजयसिंह पंडित यांनी शेतकर्‍यांच्या हितासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे रब्बी हंगामासाठी तीन आवर्तने आणि पिण्याच्या पाण्यासाठी बॅरेजमध्ये पाणी सोडण्याचा निर्णय मार्गी लागला आहे. त्यामुळे गेवराई विधानसभा मतदारसंघातील शेतकरी, नागरिकामधून समाधान व्यक्त होत असून, या निर्णयासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह माजी आमदार अमरसिंह पंडित व विद्यमान आमदार विजयसिंह पंडित यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT