

मंठा : गोरबंजारा समाजाला अनुसूचीत जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मंठा शहरातील जिंतूर-जालना रस्त्या वरील विडोळी फाटा येथे सोमवारी तीन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
मंठा येथील विडोळी फाटा येथे सकल गोरबंजारा समाजाच्या वतीने प्रा. संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आयोजित रास्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्रातील गोरबंजारा समाज आपल्या भावी पिढ्यांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी संघर्ष करीत आहे.
मात्र, वारंवार आंदोलने, मोर्चे, उपोषणे आणि निवेदने देऊनही शासनाकडून ठोस निर्णय होत नसल्याने समाजातील असंतोष आता उफाळून आला आहे. गोरगरीब गोरबंजारा समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. एसटी आरक्षण देणे शक्य नसेल तर सत्तेतून पायउतार व्हा, असा आक्रमक इशारा यावेळी त्यांनी दिला.
पुढे बोलताना प्रा. चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी आतापर्यंत लाखोंच्या संख्येने ५७ महामोर्चे काढण्यात आले. १७ युवकांनी आमरण उपोषण केले, तर सात नवतरुणांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आत्मबलिदान दिले. गोरसेनेच्या हजारो कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्ग रोखून शासनाचे लक्ष वेधले. राज्यातील सुमारे १५०० ग्रामपंचायतींमध्ये एसटी आरक्षणाच्या मागणीचे ठराव मंजूर करण्यात आले.
याशिवाय साखळी उपोषणे आणि विविध आंदोलनेही करण्यात आली. एवढा मोठा संघर्ष करूनही शासन आणि प्रशासनाला जाग येत नसेल, तर हा समाजाचा नव्हे तर शासनाच्या संवेदनशीलतेचा प्रश्न आहे, अशी टीकाही त्यांनी केली.या आंदोलनासाठी मंठा येथील शासकीय विश्रामगृह परिसरात आंदोलक एकत्र आले होते.
रथयात्रा नेणार
आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर ते नागपूर अशी राज्यव्यापी सकल गोरबंजारा एसटी आरक्षण रथयात्रा काढण्यात येणार आहे. सुमारे एक हजार वाहनांच्या ताफ्यासह ही रथयात्रा नागपूर येथे धडकणार असल्याची घोषणा प्रा. संदेश चव्हाण यांनी केली.