Insulted by the institution's director; Young employee ends life
परळी, पुढारी वृत्तसेवा: कराड साहेबांना तू विनाकारण विरोध केलास असे म्हणत कर्मचारी तरुणाला अपमानास्पद वागणूक देत अधिकचे काम करण्यास भाग पाडल्याने या तरुणाने शुक्रवारी पहाटे परळी तालुक्यातील नंदागौळ येथील राहित्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात परळी ग्रामीण पोलिसांत आईने दिलेल्या तक्रारीवरून उद्धव कराड व संजय राठोड या दोन संस्थाचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीनाथ गिते (२१) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. श्रीनाथचे वडील गोविंद गिते हे केज तालुक्यातील साने गुरुजी निवासी विद्यालयात सहशिक्षक म्हणून कार्यरत होते. सन २०१० मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला होता.
२०१६ पासून गिते कुटुंब श्रीनाथ याला अनुकंपा तत्त्वावर नोकरीस घ्या म्हणून संस्थाचालक उद्धव कराड याच्याकडे विनंती करत होते. परंतु उद्धव कराड हा वारंवार त्यांचा अपमान करत तुम्हाला काय करायचे ते करा, कोठे जायचे ते जा, श्रीनाथला माझ्या संस्थेत फुकट घेणार नाही, तसेच त्याला कोणत्याही शाळेत नोकरीस घेतले तरी मी त्यास तेथे टिकू देणार नाही, सर्व संस्थाचालक माझ्या ओळ खीचे आहेत, तुम्ही माझ्या नादी लागलात तर मी तुम्हाला चलत चलत मारून टाकीन अशी धमकी देऊन हाकलून दिले, त्यामुळे श्रीनाथ हा तणावात असल्याचे आईने तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान २०२४ मध्ये याच प्रश्नावर बीडमध्ये समाजकल्याण कार्यालयासमोर उपोषण केले. यानंतर ३ जुलै २०२५ रोजी शिक्षण उपसंचालकांनी श्रीनाथ गित्ते याला वसंत नगर तांडा येथील आश्रम शाळेत कामाठी पदावर रुजू करून घेण्याबाबत आदेश काढले. त्यानुसार संस्थाचालक संजय राठोड यच्याकडे गिते कुटुंब गेले असता त्याने देखील अपमानास्पद वागणूक दिली. तसेच रुजू करून देण्यास नकार दिला.
यानंतर समाजकल्याण विभागास पत्र लिहून आत्मदहन करण्याचा इशारा दिल्यानंतर राठोड याने श्रीनाथ याला २३ जुलै रोजी रुजू करून घेतले परंतु संजय राठोड याने श्रीनाथ याला तु संस्थाचालकांना विरोध करून चांगले केले नाहीस, कराड साहेबांना विनाकारण विरोध केला असे म्हणत चार चार लोकांचे काम एकट्याला करायला लावले तसेच वारंवार अपमान केल्याने श्रीनाथ याने आत्महत्या केल्याचे सुनीता गिते यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणात राठोड व कराड या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास परळी ग्रामीण पोलिस करत आहेत.
बीड जिल्ह्यात आश्रमशाळा चालकांच्या त्रासातून झालेली ही दुसरी आत्महत्या ठरली आहे. यापूर्वी केज तालुक्यातच मुंडे नामक संस्थाचालकाने दिलेल्या त्रासामुळे शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी आत्महत्या केली होती. त्यानंतर आता उद्धव कराड व संजय राठोड या दोन संस्थाचालकांनी त्रास दिल्याने तरुणाला गळफास घेण्याची वेळ आली. या दोन्ही प्रकरणांत गुन्हा दाखल झाला असला तरी आश्रमशाळांवरील कर्मचारी, शिक्षकांना दिला जाणारा मानसिक त्रास यानिमित्ताने समोर आला आहे.