

Government prosecutor ends life; case registered against judge, clerk
वडवणी, पुढारी वृत्तसेवा : वडवणी न्यायालयात कार्यरत असलेले सरकारी वकील विनायक चंदेल (४७) यांनी दोन दिवसांपूर्वी सरकारी अभियोक्ता कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. आत्महत्येपूर्वी मृत वकिलांनी लिहिलेल्या चिठ्ठीत न्यायाधीश आणि कनिष्ठ लिपिकाकडून सतत होणाऱ्या अपमानास्पद वागणुकीचा आणि मानसिक छळाचा उल्लेख स्पष्टपणे आढळून आला आहे. त्यावरून मयत वकिलाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीनुसार न्यायाधीश व कनिष्ठ लिपिक यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
वडवणी येथे दिवाणी व फौजदारी न्यायालय आहे. येथे विनायक चंदेल हे सरकारी वकील म्हणून कार्यरत होते. त्यांनी बुधवारी (दि. २०) सकाळी न्यायालयातच गळफास आत्महत्या केली होती. या घटनेने संपूर्ण न्यायालयीन क्षेत्र हादरले होते. मृत्युपूर्वी चंदेल यांनी लिहिलेली चिठ्ठी आढळून आली होती.
२२ ऑगस्ट रोजी चंदेल यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना आत्महत्येपूर्वीची चिठ्ठी दाखवत संबंधितावर कारवाईची मागणी केली. त्यावरून चंदेल यांचा मुलगा विश्वजीत याने वडवणी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझ्या वडिलांना जज रफिक शेख व लिपिक तारडे हे विनाकारण अपमानित करत, मानसिक त्रास देत होते. या छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली, अशी फिर्याद दिली. त्यावरून वडवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी, गेवराई प्रभारी माजलगाव निरज राजगुरू करत आहेत. न्यायालयीन पदावरील अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.