Inspection of activities in Takarvan Gram Panchayat
टाकरवण, पुढारी वृत्तसेवा : गावकऱ्यांनी आपापसातील मतभेद विसरून गावाच्या समृद्धीसाठी एकत्र येत शाश्वत विकासासाठी योगदान द्यावे, असे आवाहन गटविकास अधिकारी ज्योत्सना मुळीक यांनी केले. टाकरवण येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत १६ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ग्रामपंचायतीने राबवलेल्या विविध उपक्रमांच्या पाहणी व सोहळ्याच्या वेळी त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन लक्ष्मण लव्हाळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक एस. टी. लईडवार, तालुका आरोग्य अधिकारी मधुकर घुबडे, ए. व्ही. महाले उपस्थित होते. अभियानांतर्गत तालुक्यातील अनेक गावे सहभागी झाली असून, टाकरवण ग्रामपंचायतीने विहिरींची पाणीपातळी मोजमाप, जलव्यवस्थापन, कुटुंबनिहाय उत्पन्नवाढ, मृदा व जलसंधारण, पौष्टिक गवत कुरण निर्मिती, कन्यारत्न स्वागतासाठी वृक्षलागवड, मातीचे आरोग्य, ज्येष्ठ नागरिकांसाठी आशीर्वाद कट्टा तसेच प्रतिष्ठित व्यक्तींच्या स्मरणार्थ हरित श्रद्धांजली असे विविध उपक्रम राबविले आहेत. यावेळी बोलताना ज्योत्सना मुळीक यांनी सांगितले की, शासनाच्या विकास स्पर्धेतील निकष पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे.
गावात एकोपा निर्माण झाला, तर निश्चितच गावाचा सर्वांगीण विकास साधता येतो. या कार्यक्रमास सरपंच सुनील तौर, उपसरपंच दयानंद गोबरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विविध पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश कानडे यांनी केले.