

A mother and her children were beaten up for filming a fight at Beed
बीड, पुढारी वृत्तसेवा : टोलनाक्यावर सुरू असलेल्या भांडणाचे शूटिंग का करतो असे म्हणत सहाजणांनी आईसह दोन मुले व त्यांच्या मामाला मारहाण केल्याची घटना मांजरसुंबा ते पाटोदा रोडवर असलेल्या वैद्यकिन्ही टोलनाक्यावर सोमवारी घडली होती. या प्रकरणात बुधवारी पाटोदा पोलिस ठाण्यात सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवम शिंदे, रवींद्र जाधव, अनिकेत चौधरी, दिनकर खामकर, विठ्ठल मकाळ, अशोक शिंदे (सर्व रा. वैद्यकिन्ही, ता. पाटोदा) अशी आरोपींची नावे आहेत. भायाळा येथील प्रभाकर बांगर यांनी या प्रकरणात फिर्याद दिली आहे. बांगर यांचे वैद्यकिन्ही टोलनाक्यावर हॉटेल आहे.
या हॉटेलवर त्यांचा असलेला मुलगा सुरज बांगर हा टोलनाक्याजवळ फोनवर बोलत असताना त्या ठिकाणी भांडण सुरू होते. तेथे असलेल्या राहुल शिंदे याने सुरज याला तू भांडणाची शूटिंग काढतो का, असे म्हणत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी सुरजचा मामा महादेव राख हा त्या ठिकाणी सोडवण्यासाठी गेला असता शिवम शिंदे, रविंद्र जाधव, अनिकेत चौधरी, दिनकर खामकर, विठ्ठल मकाळ यांनी हॉकी स्टीक, लोखंडी रॉडने सुरज, सौरभ बांगर, महादेव राख यांच्यासह सुरज याच्या आईला मारहाण केली.
तसेच महादेव यांच्या हातील अंगठी काढून घेतल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी अद्याप अटक करण्यात आलेले नाहीत.
पिस्टल तोंडावर मारली
वैद्यकिन्ही टोलनाक्यावर ही मारामारी सुरू असताना त्या ठिकाणी अशोक शिंदे हा चारचाकी गाडीतून आला. यावेळी त्याने त्याच्या हातातील पिस्टल उलटा करून महादेव यांच्या तोंडावर मारल्याने त्यांना गंभीर जखम झाली. या सर्व जखमींवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच या प्रकरणात आरोपींना अटक व्हावी या मागणीसाठी भायाळा ग्रामस्थांनी पोलिस अधीक्षकांनादेखील निवेदन दिले आहे.