Illegal Pistol Seized File Photo
बीड

Beed Crime | आष्टी येथे बेकायदेशीर पिस्टलसह आरोपी अटकेत; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

आष्टी पोलिसांची धडक कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Ashti Police Illegal Pistol Seized

आष्टी : आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या एका आरोपीला आष्टी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. या कारवाईत एक देशी पिस्टल, त्यामधील दोन काडतुसे (एक जिवंत व एक चेंबरमध्ये अडकलेले) तसेच कार असा एकूण सुमारे ११ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ जुलै रोजी रात्री पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांना गोपनीय माहिती मिळाली. आष्टी–ब्रह्मगाव मार्गावरील पांढरी शिवारातील साईदीप हॉटेलसमोर उभ्या असलेल्या काळ्या रंगाच्या (क्रमांक MH14 JX 2145) कारमध्ये एक व्यक्ती बेकायदेशीर पिस्टलसह थांबलेली असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाईची तयारी केली.

या माहितीची खातरजमा करून पोलीस उपनिरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार क्षीरसागर, तागड, काकडे तसेच पोलीस शिपाई वाणी व तांबे यांनी पंचांसमवेत घटनास्थळी छापा टाकला. संशयिताची आणि वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता कारच्या पुढील सीटखाली एक पिस्टल आढळून आले. पिस्टलच्या मॅगझीनमध्ये एक जिवंत काडतूस तर चेंबरमध्ये एक अडकलेले (फसलेले) काडतूस असल्याचे निष्पन्न झाले.

चौकशीदरम्यान संशयिताने आपले नाव संतोष नवनाथ विटकर (वय ४३, रा. पाण्याच्या टाकीजवळ, आष्टी, ता. आष्टी, जि. बीड) असे सांगितले. या प्रकरणी आरोपीविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी, आष्टी उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद भुतेकर, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा शिंदे, पोलीस हवालदार क्षीरसागर, तागड, काकडे तसेच पोलीस शिपाई वाणी आणि तांबे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT