Hidden child marriage exposed in Dharur; Action taken against families
धारूर, पुढारी वृत्तसेवा : धारूर तालुक्यातील मौजे घागरवाडा येथील एका ऊसतोड मजुरांच्या कुटुंबातील अल्पवयीन मुलीचा लपूनछपून विवाह केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, भाईजळी येथील ३२ वर्षीय तात्याराम मुंडे यांच्यासह मुलीच्या आणि मुलाच्या दोन्ही कुटुंबांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत धारूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
राज्यात १५ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या 'वालविवाह मुक्त महाराष्ट्र आपला संकल्प' या व्यापक जनजागरण मोहिमेदरम्यान ही घटना उघड झाल्याने संपूर्ण प्रशासन आणि सामाजिक क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे. १४ ऑक्टोबर रोजी चाईल्ड हेल्पलाइन १०९८ वर प्राप्त झालेल्या तक्रारीत अल्पवयीन मुलीचा प्रौढ व्यक्तीसोबत विवाह लावण्यात आल्याची माहिती देण्यात आली. चाईल्ड हेल्पलाईनने ग्रामसेवकांना तात्काळ शहानिशा तपासासाठी पत्र पाठवले.
तपासात तक्रार खरी आढळताच ग्रामसेविकांनी मुलगी आणि तिचे पालक यांना मा. बाल कल्याण समिती, बीड समोर हजर केले. समितीने बालिकेचे संरक्षण सुनिश्चित करत तिला शक्तीसदनमध्ये दाखल करण्याचा आदेश दिला आणि बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ अंतर्गत कारवाईची लेखी सूचना ग्रामसेवकांना दिली.
त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, बीड यांच्या सुनावणीनंतर १३ नोव्हेंबरला दोन्ही कुटुंबांवर गुन्हा नोंदविण्यात आला. यामुळे बालविवाहाच्या घटना वारंवार समोर येत आल्या आहेत. २००६ च्या कायद्याने बालविवाह गुन्हा ठरला असला, तरी ग्रामीण भागात सामाजिक दडपण, परंपरा आणि 'बाहेरच्या नजरेपासून लपवून' विधी पार पाडण्याची प्रथा अद्याप बंद झालेली नाही.
बालकांचे हक्क अबाधित राखण्यासाठी प्रशासन, पोलिस, सामाजिक संस्था, ग्रामपंचायत आणि नागरिक सर्वांनी एकत्र येऊन पुढाकार घेणे अत्यावश्यक आहे. केवळ अभियान पुरेसे नाही; ग्रामपातळीवर सतत देखरेख आणि संवाद आवश्यक आहे असे संतोष रेपे यांनी सांगितले.