Heavy rains in Beed cause major damage to cotton
जामखेड, पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील जामखेड व परिसरात परतीच्या पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांची कोंडी केली आहे. अनेक शेतांमध्ये कापसाचं पीक पावसात भिजून सडतं आहे. ओलसर माती, चिखलात बुडालेली झाडं, काळसर डागांनी झाकलेली झाडं अशी चित्रं सध्या सर्वत्र दिसत आहेत.
अतिवृष्टीने आधीच हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांचा थोडाफार उरलेला कापूस आता परतीच्या पावसाने पूर्णपणे भिजला आहे. "कापूस म्हणजे आमचं पांढरं सोनं, पण या वर्षी तोच आमच्यासाठी ओझं ठरला," असं सांगताना जामखेड येथील शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले आहे. वेचणीसाठी मजूर मिळत नाहीत. जे मिळतात त्यांना ५०६० रुपये धडा द्यावा लागतो. त्यात कापसाचे भाव कमी झाल्याने खर्च वाढतोय आणि नफा शून्याच्या घरात पोहोचला आहे. "भाव नाही, मजुरी महाग आणि सरकार गप्प हीच आजची खरी शेतकऱ्यांची कहाणी आहे," असा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा सूर आहे.
परिसरातील अनेक शेतांमध्ये कापूस भिजल्याने बॉर्ड सडू लागली आहेत. काहींनी प्लास्टिक टाकून कापूस वाचवण्याचा प्रयत्न केला, पण सततच्या पावसाने सर्व श्रम व्यर्थ ठरले. व्यापाऱ्यांनीही भिजलेल्या कापसाचे भाव कमी केले आहेत. शासनाकडून अद्याप पंचनामा, आर्थिक मदत किंवा कर्जमाफीबाबत कोणतीही ठोस हालचाल दिसून आलेली नाही. जामखेड परिसरातील शेतकऱ्यांनी या परिस्थितीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे. जिह्यातील शेतकरी हतबल झाल्याचे दिसून येत आहे.
कर्ज फेडणार कसे
महिनोमहिने घाम गाळून उभं केलेलं पीक आता शेतातच सडतंय. कापूस वाळवण्यासाठी दिवस-रात्र प्रयत्न करतोय, पण पावसाने सर्व परिश्रम व्यर्थ ठरवले. आता खर्च भागवायचा कसा आणि कर्ज फेडायचं कसं, हेच समजेनासं झालंय, असे मत शेतकरी मनोज निलाखे यांनी व्यक्त केले आहे.