

Diwali was celebrated with great joy for the orphans and homeless through Beed Chief Officer Shailesh Phadse.
बीड, पुढारी वृत्तसेवा : रस्त्याच्या कडेला, बस स्थानकासह इतरत्र बेवारस स्थितीत अश्नयास असलेल्या निराधारांना शासनाच्या वतीने चालवण्यात येत असलेल्या जिव्हाळा बेघर निवारा केंद्रात नगर परिषद, बीडचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांच्या माध्यमातून अनाथ, बेघर यांची दिवाळी अतिशय आनंदात साजरी करण्यात आली.
प्रारंभी जिव्हाळा बेघर निवारा केंद्रास भेट दिल्यानंतर मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी तेथील निवास व्यवस्था, आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली तसेच तेथील रेकॉर्ड पाहून व्यवस्थापनाचे कौतुक करून दीपावलीनिमित्त सर्वाना आरोग्यमय शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी शैलेश फडसे यांच्या माध्यमातून एन.जी.ओ. अमोल बडगुजर यांनी जिव्हाळा परिवाराला आकाशकंदील, फटाके, पणत्या, इमारतीला लाइटिंग, रांगोळी, आणि मोठ्या प्रमाणात फराळाचे साहित्य तसेच दोन वेळेला जेवण शैलेश फडसे यांनी स्वतः पुढाकार घेत देऊन माणुसकीचे दर्शन घडवले. यानिमित्ताने मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी जिव्हाळा बेघर निवारा केंद्रास सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. दीपावलीनिमित्त येथील युवती, महिला- पुरुष लाभार्थ्यांनी आपल्या विविध कलागुणांचे सादरीकरण केले.
त्यांच्यातील कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले. बीड शहरातील भाजी मंडई परिसरात बेघर, निराधार, निराश्रित, दिव्यांग, अनाथ बेघरांसाठी शासनाच्या वतीने जिव्हाळा बेघर निवारा केंद्राची स्थापना करण्यात आली. या बेघर निवारा केंद्रात निवास, भोजन, आरोग्य सुविधांसह स्वावलंबन, रोजगार, संस्कार आणी संस्कृती रक्षणाचे काम सुरू असून बीड शहरातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देऊन अनाथांचे नाथ व्हावे अशी भावना मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी व्यक्त केली.
न.प. बीडचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी जिव्हाळा बेघर निवारा केंद्रास भेट देऊन मार्गदर्शन केले तसेच अनाथांची दिवाळी स्वखर्चातून गोड केली त्यानिमित्ताने जिव्हाळा परिवाराच्या वतीने नगरपालिकेचे मुख्याधिकारी, अमोल बडगुजर यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे जिव्हाळा बेघर निवारा केंद्राचे संचालक अभिजित वैद्य, व्यवस्थापक राजू वंजारे, यश वंजारे, काळजीवाहक छाया सरोदे यांनी मनापासून आभार मानले.