GST officials raided a trader's house in Beed
बीड, पुढारी वृत्तसेवा : बीड शहरातील मोंढा भागातील शनि मंदिर परिसरातील एका व्यापाऱ्याच्या निवासस्थानी गुरुवारी जीएसटी विभागाने मोठी धाड टाकली. छत्रपती संभाजीनगर येथील जीएसटी पथकाने सकाळी सात वाजल्यापासून सलग नऊ तास ही तपासणी केली. या कारवाईत पथकाने संगणकासह काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली असून, व्यापाऱ्यांच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
शहरातील शनि मंदिर परिसरात सोमाणी नामक व्यापाऱ्याचे निवासस्थान आहे. या व्यापाऱ्याचे डिजिटल प्रिंटिंग, प्लॉटिंग तसेच जाहिरात एजन्सी असे विविध व्यवसाय आहेत. व्यवसायातील कोट्यवधींचे व्यवहार संशयास्पद असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जीएसटी विभागाने ही धडक कारवाई केली.
सकाळी सात वाजताच सात ते आठ अधिकाऱ्यांचे पथक पेठबीड पोलिसांच्या बंदोबस्तात सोमाणी यांच्या घरी धडकले. सायंकाळी चार वाजेपर्यंत चाललेल्या या प्रदीर्घ तपासणीनंतर पथक आवश्यक पुरावे घेऊन संभाजीनगरकडे रवाना झाले. या कारवाईत नेमका किती रुपयांचा करचोरीचा मामला समोर आला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
बीडमध्ये जीएसटी घोटाळ्याचे रॅकेट सक्रिय ? पंधरा दिवसांपूर्वीच नागपूर पोलिसांच्या पथकाने बीडमध्ये येऊन दोन तरुणांना अटक केली होती. त्या पाठोपाठ आता थेट व्यापाऱ्याच्या घरावर जीएसटी विभागाने धाड टाकल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.