

माजलगाव – माजलगाव–पाथरी रोडवरील रामनगर परिसरात बुधवारी रात्री सुमारे अकराच्या सुमारास भीषण अपघात घडला. स्विफ्ट डिझायर कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कार पलटी होऊन झालेल्या अपघातात एक तरुण जागीच ठार झाला, तर तिघेजण जखमी झाले.
या अपघातात माजलगाव येथील निवृत्ती भाऊसाहेब खेडकर (वय २५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. निवृत्ती खेडकर हे आपल्या स्विफ्ट डिझायर कारने माजलगावहून पाथरीकडे जात होते. रामनगरजवळ अचानक कारवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला पलटी झाली. अपघात इतका भीषण होता की निवृत्ती खेडकर यांच्या डोक्याला गंभीर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
कारमध्ये असलेले अन्य तिघे जण जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी माजलगाव येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना सुटी देण्यात आल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.