

गौतम बचुटे
केज :- केज तालुक्यातील साळेगाव येथील जनावरांच्या आठवडी बाजारात विक्रीसाठी आणलेला व्यापाऱ्याचा बैल बिथरला आणि तो उधळला. समोर दिसेल त्या वाहनाला आणि माणसाना धडकत सुटल्याने बाजारकरी आणि गावकरी भयभीत झाले होते. पण काही धाडस तरुणांनी त्याला धरून काबूत आणले.
साळेगाव ता. केज येथे दर गुरुवारी जनावरांचा जंगी बाजार भरत असतो. दि. २२ जानेवारी रोजी एका व्यापाऱ्याने विकत घेतलेला बैल गर्दी आणि माणसे पाहून बिथरला आणि त्याला बांधलेला कासरा तोडून उधळला. त्या बैलाने अनेक वाहनांना धडकले ते श्रीमती कमलबाई अच्युत गित्ते आणि श्रीमती तारामती सिद्धलिंग झाडबुके यांना धडकून जखमी केले. त्या नंतर बिथरलेला बैल केज रोडने धावत सुटला.
समोर जे येईल त्याच्यावर हल्ला करण्याच्या पवित्र्यात होता. दरम्यान शाळेजवळ बैल गेल्याने विद्यार्थी आणि शिक्षक भयभीत झाले. गावकऱ्यांनी तहसीलदार, वनविभाग, पशुधन अधिकारी आणि पोलिस यांच्याशी संपर्क साधला. त्या नंतर सरपंच कैलास जाधव, उपसरपंच गणेश गालफाडे, राजेश तिडके, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब बांगर यांनी दत्ता तोंडे यांना माहिती दिली.
त्या नंतर दत्ता तोंडे, बालाजी मुळे आणि मनोज जाधव या तीन तरुणांनी उधळलेल्या बैलाला मोठ्या हिमतीने आणि शिताफीने पकडून कासऱ्याने जखडून ठेवले. त्या नंतर मात्र सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.