केज: सस्ता रोए बार-बार, महंगा रोए एक बार या म्हणीचा प्रत्यय केज येथे आलेल्या एका सोनाराला आला. दुबईहून आणलेले सोन्याचे बिस्किट बाजारभावापेक्षा कमी दरात देण्याचे आमिष दाखवून सोनाराला तब्बल तीन लाख रुपयांना गंडा घालण्यात आला. धक्कादायक म्हणजे लूट करून पळून जाणाऱ्या टोळीतील दोघे चोरटे अपघातात जखमी झाल्याने पोलिसांच्या हाती लागले, तर त्यांच्या इतर साथीदारांनी रोकड घेऊन पोबारा केला.
माजलगाव तालुक्यातील टाकरवन येथील सोन्या-चांदीचे व्यापारी दत्ता काकडे यांना सोशल मीडियावरून धाराशिव जिल्ह्यातील एका व्यक्तीने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून ओळख वाढवली. त्यानंतर दुबईहून टॅक्स चुकवून आणलेली सोन्याची बिस्किटे स्वस्तात देण्याचे आमिष दाखवत त्यांना केज येथे बोलावण्यात आले.
दि. 17 मे रोजी दुपारी दत्ता काकडे व त्यांचे कारागीर सतीश दीक्षित हे तीन लाख रुपयांची रोकड घेऊन लाल रंगाच्या किया कारमधून केज येथे आले. आरोपी आप्पा शिवाजी शिंदे व विशाल रामकिसन शिंदे यांनी त्यांना बीड रोडवरील उमरी फाट्याजवळील गंगा माऊली साखर कारखाना परिसरात नेले. तेथे आधीपासून दबा धरून बसलेल्या दहा ते बारा जणांच्या टोळीने सतीश दीक्षित यांच्या हातातील पैशांची पिशवी हिसकावून घेतली. विरोध करताच एका आरोपीने लोखंडी रॉडने सोनाराच्या पाठीवर वार केला.
घटनेनंतर आरोपी मोटारसायकल व अन्य वाहनांवरून पसार झाले. मात्र आरडाओरड ऐकून स्थानिक नागरिकांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. यावेळी भरधाव वेगाने पळणारे आप्पा शिंदे व विशाल शिंदे यांनी टाकळी फाट्याजवळ मोटारसायकल वळवताना बीडकडून येणाऱ्या इंडिका कारला धडक दिली. त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात कार रस्त्याकडेला झाडावर आदळून अपघात झाला.
या अपघातात दोन्ही आरोपी जखमी झाले असून त्यांच्यावर केज उपजिल्हा रुग्णालयात पोलिस बंदोबस्तात उपचार सुरू आहेत. अपघातस्थळी एक धारदार चाकू व केबल वायरचा बंच पोलिसांना आढळून आला.घटनेची माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले.
फरार आरोपींचा शोध सुरू असून या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, स्वस्तात सोने किंवा मौल्यवान वस्तू देण्याचे आमिष दाखवणाऱ्यांपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे यांनी केले आहे.