

मिरा रोड: मैत्रिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून एका 20 वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याला रात्रभर कारमध्ये डांबून अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना भाईंदरमध्ये उघडकीस आली आहे. आरोपींनी केवळ मारहाणच केली नाही, तर तरुणाचे कपडे उतरवून त्याच्या पोटाला पेटत्या सिगारेटचे चटके दिले आणि सोन्याचे दागिने व मोबाईल लुटून 6 लाखांची खंडणी मागितली. याप्रकरणी नवघर पोलिसांनी दोघांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
भाईंदर पूर्वेच्या सोनम दर्शन परिसरात राहणाऱ्या तक्रारदाराला 12 मे रोजी रात्री 11:30 च्या सुमारास त्याच्या ओळखीच्या मित्रांनी सिगारेट पिण्याच्या बहाण्याने गोल्डन नेस्ट परिसरात बोलावले. तक्रारदार तिथे पोहोचताच आशिष राज, यशवंत पवार, रितेश विश्वकर्मा आणि त्यांच्या इतर दोन साथीदारांनी त्याला बळजबरीने चारचाकी गाडीत बसवून त्याचे अपहरण केले.
आरोपी आशिष राज याला तरुणाचे त्याच्या मैत्रिणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. याच रागातून आरोपींनी श्रेयसला रात्रभर कारमध्ये फिरवून लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी बांबूने बेदम मारहाण केली. आरोपी रितेश विश्वकर्मा याने तरुणाचा मोबाईल आणि सोन्याची चैन जबरदस्तीने काढून घेतली.
इतक्यावरच न थांबता, आरोपींनी त्याचे सर्व कपडे उतरवून त्याला विवस्त्र केले आणि त्याच्या पोटावर पेटत्या सिगारेटचे चटके दिले. त्याला गांजाच्या केसमध्ये फसवण्याची धमकी देऊन 6 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. या भयंकर प्रकारानंतर तरुणाने नवघर पोलीस ठाण्यात धाव तक्रार दिली.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त सोहेल शेख आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने तपास करून आशिष राज, वय 22, रा. रामदेव पार्क, मीरा रोड व यशवंत पवार, वय 22, रा. काशिनगर, भाईंदर पूर्व या दोन मुख्य आरोपींना अटक केली.
या घटनेतील इतर फरार आरोपींचा शोध सुरू असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल तळेकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आरोपींवर अपहरण, मारहाण, जबरी चोरी आणि खंडणी मागितल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे भाईंदर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.