गेवराई : गेवराई तालुक्यात बिबट्याचा वावर असल्याच्या अफवा सोशल मीडियावरून पसरत असून त्यामुळे नागरिकांमध्ये अनावश्यक भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. मात्र या अफवांना बळी न पडता नागरिकांनी संयम राखून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, तसेच वन्यप्राण्याचा यात कोणताही दोष नसल्याचे स्पष्ट करत वन विभागाने दक्षतेचे आवाहन केले आहे.
ताकडगाव येथे बिबट्या निघाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर दै. पुढारीने वन विभागाशी संपर्क साधून संबंधित व्हिडिओ तपासणीसाठी पाठवला. याची गंभीर दखल घेत वनरक्षक रामराव सोनकांबळे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
घटनास्थळी आढळलेल्या पाऊलखुणांची बारकाईने तपासणी केल्यानंतर या खुणा बिबट्याच्या नसून श्वानाच्या असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे ताकडगाव येथील बिबट्याची बातमी ही निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, गेवराई तालुक्यात काही भागांत बिबट्याचा अधूनमधून वावर आढळतो.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहणे गरजेचे असल्याचे वनविभागाने नमूद केले आहे. कामानिमित्त वाडी-वस्ती ते शेत किंवा शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी शक्यतो समूहाने ये-जा करावी. शेतात वाकून काम करताना पाठीमागून हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेऊन विशेष काळजी घ्यावी.
संध्याकाळी व रात्रीच्या वेळी घराच्या अंगणात लहान मुलांना एकटे सोडू नये. घराभोवती व अंगणात पुरेसा प्रकाश ठेवावा, शक्य असल्यास शेकोटी पेटवावी. पशुधन रात्री गोठ्यात बांधताना गोठा सर्व बाजूंनी बंदिस्त असल्याची खात्री करावी. गुरे चारायला जाताना समूहाने जावे तसेच जंगलालगत किंवा गावापासून दूर नेणे टाळावे.संध्याकाळी व रात्री एकट्याने बाहेर पडणे टाळावे. बिबट्या समोर आल्यास आरडाओरडा करावा, खाली वाकू नये किंवा झोपू नये.
बिबट्यासंदर्भात चुकीच्या बातम्या व अफवा पसरवू नयेत. कोणतीही माहिती खात्रीशीर नसेल तर ती पुढे पाठवू नये, असे आवाहन वनरक्षक रामराव सोनकांबळे यांनी केले आहे. वन्यप्राण्यांची हत्या करणे, त्यांना जखमी करणे, पकडणे किंवा त्यांची पिल्ले पळविणे हा वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत गंभीर गुन्हा असून कठोर कारवाई होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.