गेवराई :अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीविरोधात गेवराई पोलिसांनी सलग धडक कारवाया करत अवघ्या २४ तासांत दोन ठिकाणी कारवाई केली. या कारवाईत वाळूसह पिकअप, ट्रॅक्टर व ट्रॉली असा एकूण ११ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिस अधीक्षक नवनीत कांवत यांच्या आदेशानुसार गेवराई पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत १६ जुलै रोजी पहाटे शहर व परिसरात गस्तीदरम्यान जातेगाव रोडवरील कुलकर्णी हॉस्पिटलजवळ विनानंबरचा पांढऱ्या रंगाचा पिकअप अवैधरीत्या वाळूची वाहतूक करताना आढळून आला. पोलिसांनी वाहन ताब्यात घेत वाळूसह ६ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक राम खोत करीत आहेत.
याच दिवशी सकाळी सुमारे ९.१५ वाजण्याच्या सुमारास गोंदी खुर्द परिसरात दुसरी कारवाई करण्यात आली. येथे विनानंबर ट्रॅक्टर-ट्रॉलीतून विनापरवाना वाळूची वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी ट्रॅक्टर, ट्रॉली व वाळू असा ५ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणाचा तपास पोलिस हवालदार अशोक हंबर्डे करीत आहेत.
या दोन्ही कारवायांमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून गेवराई पोलिसांनी वाळूमाफिया विरोधात कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक किशोर पवार, पोलिस उपनिरीक्षक राम खोत, पोलिस उपनिरीक्षक हिमांशू नागरे, पोलिस हवालदार कल्याण राठोड, अशोक हंबर्डे तसेच गोरक्ष डोके, धीरज खांडेकर, इसाक शेख आदींच्या पथकाने केली.