Beed Crime pudhari photo
बीड

Beed Crime : अवैध धंद्यांवर ‘सर्जिकल स्ट्राइक’; ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!

वाळू तस्करीचा हायवा पकडला, जुगार अड्ड्यावर धाड; दहा जुगारी पोलिसांच्या जाळ्यात

पुढारी वृत्तसेवा

गेवराई : अवैध धंद्यांनी डोके वर काढले की पोलिसांचा दणका किती निर्णायक ठरतो, याची प्रचिती गेवराईत आली. गोदावरी नदीपात्रातून बिनपरवाना वाळू वाहतूक करणाऱ्या हायवावर झडप घालत पोलिसांनी लाखोंचा मुद्देमाल जप्त केला, तर शहरातील जुगार अड्ड्यावर अचानक छापा टाकून दहा जणांना रंगेहाथ पकडले. दोन वेगवेगळ्या कारवायांत तब्बल ३२ लाख ३९ हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल जप्त झाल्याने अवैध धंदेवाल्यांच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात कठोर भूमिका घेत कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्याच निर्देशांची अंमलबजावणी करत गेवराई पोलिसांनी वाळू तस्करी आणि जुगार अड्ड्यांवर थेट कारवाईचा बडगा उगारला. पोलीस निरीक्षक बुद्धीराज सुकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या दोन कारवाया केल्या.

संगमजळगाव शिवारातील गोदावरी नदीपात्रातून विनापरवाना वाळू उपसा करून हायवातून गेवराईच्या दिशेने वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा करत शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास पोलिसांनी नदीपात्रात धडक दिली. यावेळी पिवळ्या रंगाचा विनानंबर भारत बेंझ हायवा वाळू वाहतूक करताना आढळला.

चालक दादाराव दत्तू राठोड (३२, रा. रामनगर तांडा, कुंभेजळगाव, ता. गेवराई) याच्याकडे वाळू उत्खनन अथवा वाहतुकीचा कोणताही परवाना नव्हता. पोलिसांनी हायवासह २५ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि गौण खनिज अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

दुसरीकडे, शहरातील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी नजर वळवली. गुरुवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास जालना रोडवरील जमादारनी पुलाजवळ चार्वक हॉटेलच्या मागील बाजूस सुरू असलेल्या तिर्रट जुगार अड्ड्यावर पोलिसांनी अचानक धाड टाकली. पोलिसांची चाहूल लागताच जुगार खेळणाऱ्यांची धावपळ उडाली; मात्र दहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

संतोष बारगजे,संतोष नेवाळे, शेख गफार, कदिर शेख, अर्जुन धुतडमल, भरत इंगोले, सुभाष भावले, ज्ञानेश्वर वादे, संजय सुतार आणि मजहर शेख या दहा जणांकडून रोख रक्कम, दहा मोबाईल, सहा मोटारसायकली आणि एक स्कुटी असा ७ लाख १५ हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६९८/२०२६ नुसार महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार डोळस करीत आहेत.

वाळू तस्करी आणि जुगार अड्ड्यावरील या दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण ३२ लाख ३९ हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत,अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. गेवराई पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी आता थेट मैदानात उतरल्याचा संदेश दिला असून, अशा धंद्यांवर कारवाईची धार कायम राहणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT