

जालना : शहरातील जुना जालना भागातील गवळी मोहल्ला येथे झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे, पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या आरोपीसह चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या सराफालाही अटक केली असून आरोपींकडून ३ तोळे ७४६ मिलीग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
जुना जालन्यातील गवळी मोहल्ला भागात राहणाऱ्या उमाकांत चंद्रकांत लालसरे यांनी २० नोव्हेंबर रोजी १२ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून घरातील लोखंडी कपाटाच्या ड्रॉवरमधून अडीच तोळे वजनाचा सोन्याचा हार आणि २ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र असा ऐवज चोरून नेल्याची तक्रार केली होती.या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने संशयीत आकाश राजू तिडके (, रा. इंदीरानगर, जुना जालना) यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने साथीदारांसह चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीकडून ३ तोळे ७४६ मिलीग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले.
तसेच उर्वरित सोन्याच्या मंगळसूत्राचा तुकडा रहमान ज्वेलर्सचे दुकानदार सय्यद महेफुजुर रहमान अली (रा. संजयनगर, जुना जालना) याला दिल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार पोलिसांनी सराफालाही ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी संशयीत आकाश राजू तिडके यांच्यासह सोने खरेदी करणाऱा सराफ सय्यद महेफुजुर रहमान अली (रा. संजयनगर, जुना जालना).यांना अटक केली.
मुद्देमाल जप्त
या प्रकरणात पोलिसांनी सुमारे २.५ तोळे सोन्याचा हार, १२.४६० ग्रॅम वजनाचे तुटलेले सोन्याचे मंगळसूत्र असा मुद्देमाल जप्त केला.चोरीचा गुन्हा उघड करण्यात स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.