गेवराई : गेवराई तालुक्यातील मादळमोही सर्कल अंतर्गत भंडगवाडी गावात रविवारी रात्री ९.३५ वाजण्याच्या सुमारास वीज पोलवर बिबट्या चढल्याची अफवा पसरली. काही नागरिकांना पोलवर हालचाल दिसल्याचा संशय आल्याने ही माहिती काही वेळातच संपूर्ण गावात पसरली. परिणामी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून काही काळासाठी गावात गोंधळाचे चित्र दिसून आले.
या घटनेची माहिती मिळताच मादळमोही येथील सामाजिक कार्यकर्ते व नेहमी मदतीसाठी अग्रेसर असणारे राजेश रसाळ यांच्यासह अंगद कारले, संभाजी हक्कदार, विष्णू काचोळे, भीमसेन मिसाळ, दादा पवार, दत्ता घिगे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी टॉर्च व वाहनांच्या प्रकाशाच्या सहाय्याने परिसराची बारकाईने पाहणी केली.
पाहणीनंतर त्या ठिकाणी बिबट्या नसून ‘उद’ (साळींदर) हा प्राणी असल्याचे स्पष्ट झाले. खरी परिस्थिती समजताच नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र अफवेच्या काळात काही काळ नागरिकांमध्ये भीती व तणावाचे वातावरण होते.
वन्यप्राण्यांबाबत अफवा झपाट्याने पसरत असल्याने नागरिकांनी कोणतीही माहिती पसरवण्यापूर्वी तिची खात्री करून घ्यावी, तसेच संशयास्पद प्रकार आढळल्यास थेट वनविभाग किंवा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी राजेश रसाळ यांनी केले