

गेवराई: तालुक्यात बिबट्याच्या सतत होत असलेल्या दर्शनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तळणेवाडी परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर तागडगाव शिवारातील शेतकरी अंबादास जोंधळे यांच्या शेतात मंगळवारी (दि.9) सकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास बिबट्या दिसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
सकाळच्यावेळी शेतात कामासाठी गेलेल्या नागरिकांना अचानक बिबट्या दिसताच एकच खळबळ उडाली. काही वेळातच ही बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरली असून नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. शेतमजूर, शेतकरी व शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
बिबट्याच्या हालचाली लक्षात घेता तातडीने वन विभागाने घटनास्थळी पथक पाठवून पाहणी करावी व पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. दरम्यान, नागरिकांनी अनावश्यकपणे बाहेर पडू नये, शेतात एकट्याने जाणे टाळावे तसेच लहान मुलांकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन जाणकारांकडून करण्यात येत आहे.
गेवराई तालुक्यात दोन ठिकाणी बिबट्या दिसला असल्याचे व्हिडिओ पाहिले असून तागडगाव शिवरात बिबट्या चे पाऊल दिसतात का हे पाहण्यासाठी आलो असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये शेतामध्ये एकटे जाऊ नये ऊस तोडणी चालू असल्यामुळे शेतात शिकारी साठी लपून बसलेला बिबट्या आता दिसत आहे.
रामराव सोनकांबळे वन रक्षक गेवराई