

गेवराई (प्रतिनिधी): गेवराई तालुक्यात, विशेषतः चकलांबा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. धुमेगाव आणि आडपिंप्री यांसारख्या परिसरात मागील आठ ते दहा दिवसांपासून चोरांचा सुळसुळाट सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अशाच एका घटनेत, आडपिंप्री येथील एका घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ₹56,000 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना शुक्रवार, दि. 31 ऑक्टोबर रोजी रात्री घडली.
आडपिंप्री येथील रहिवासी नारायण गणपत गलधर (वय 50) हे त्यांच्या कुटुंबासह शुक्रवारी रात्री 9:30 च्या सुमारास झोपले होते. कुटुंबीय झोपेत असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री गलधर यांच्या घराचा दरवाजा तोडला आणि घरात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी कपाटाचे कुलूप तोडून आतील सामान अस्तव्यस्त केले. या चोरीत चोरट्यांनी ६ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत आणि 20,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 56,000 रुपयांचा ऐवज चोरून नेला.
ही घटना शनिवारी (दि. 1 नोव्हेंबर) पहाटे 2:30 वाजताच्या सुमारास गलधर यांच्या निदर्शनास आली. ते लघुशंकेसाठी उठले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी त्वरित त्यांच्या पत्नीला आवाज देऊन उठवले.
घरातील कपाटातील सामान विस्कटलेले पाहून त्यांनी लॉकरची तपासणी केली असता चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नारायण गलधर यांनी तत्काळ चकलांबा पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात चोरट्यांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. गलधर यांच्या फिर्यादीवरून चकलांबा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चकलांबा पोलीस करत आहेत. वाढत्या चोरीच्या घटना पाहता, पोलिसांनी या परिसरातील गस्त वाढवून चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.