Crime News pudhari photo
बीड

Beed Crime : लग्नासाठी अडीच लाख घेऊन तरुणाची फसवणूक

लग्न जुळवणाऱ्यांविरोधात गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; वधू अल्पवयीन

पुढारी वृत्तसेवा

गेवराई: विवाहासाठी स्थळ शोधणाऱ्या गेवराई येथील एका २१ वर्षीय तरुणाची लग्न जुळवून देण्याच्या बहाण्याने अडीच लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा आरोप समोर आला आहे. याप्रकरणी मनोज दत्ता डेरे या तरुणाने दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ५ऑक्टोबर रोजी झालेला विवाह आपली फसवणूक करून लावण्यात आल्याचे सांगत संबंधित तरुणीनेही हा विवाह मान्य नसल्याचा जबाब दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

तक्रारदार मनोज डेरे याच्या म्हणण्यानुसार, त्याच्या आई-वडिलांकडून विवाहासाठी स्थळ शोधले जात असताना जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथील दुर्गा निकाळजे व शिवाजी निकाळजे यांनी लग्न जुळवून देण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर एका तरुणीचे छायाचित्र आणि माहिती पाठविण्यात आली.

१ ऑक्टोबर रोजी तरुणीला पाहण्यासाठी मनोज आणि त्याचे आई-वडील जाफराबाद येथे गेले होते. त्यावेळी मुलीच्या कुटुंबीयांनी विवाहासाठी अडीच लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, ऊसतोडीच्या हंगामासाठी मुकादमाकडून आगाऊ रक्कम घेऊन पैशांची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर ५ ऑक्टोबर रोजी संबंधित तरुणीला गेवराई येथे आणून विवाह लावण्यात आला.

या विवाहासाठी ५० हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने, तर उर्वरित दोन लाख रुपये रोख दिल्याचा दावा मनोज डेरे याने तक्रारीत केला आहे. विवाहानंतर दोन दिवसांनी तरुणीने आपल्याला घरी राहायचे नसल्याचे सांगितले. त्यानंतर तिने हा विवाह फसवणुकीच्या उद्देशाने लावण्यात आल्याचे सांगितल्याचा दावा तरुणाने केला आहे. पैसे परत मागितल्यानंतर संबंधितांकडून टाळाटाळ करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

अल्पवयीन मुलगी सुधारगृहात

संबंधित तरुणीला गेवराई येथे कोणीही नातेवाईक नसल्याचे नमूद करत, तिच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नातेवाइकांची खातरजमा होईपर्यंत तिला बीड येथील सुधारगृहात ठेवण्याबाबत पोलिसांकडून अहवाल सादर करण्यात आला आहे. या प्रकरणात तरुणाने संबंधितांविरुद्ध कारवाई करून आपली अडीच लाख रुपयांची रक्कम परत मिळवून देण्याची मागणी केली आहे.

नावही निघाले वेगळेच!

दरम्यान, १९ ऑक्टोबर रोजी पोलिसांसमोर दिलेल्या जबाबात तरुणीने आधारकार्डवरील नाव आणि स्वतःचे खरे नाव वेगवेगळे असल्याचे सांगितले. आपल्याला पूर्वकल्पना न देता गेवराई येथे आणून विवाह लावण्यात आला असून, हा विवाह मान्य नसल्याचे तिने स्पष्ट केले. तसेच आपल्याला आई-वडिलांकडे जायचे असल्याचेही तिने जबाबात नमूद केले आहे. या प्रकरणातील सत्य पोलीस तपासात समोर येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT