Beed Political News : उत्साही कार्यकर्त्यांमुळे नेत्यांचीच राजकीय कोंडी!‌

‘आमचा नेता की तुमचा नेता‌’च्या संघर्षात बीड जिल्ह्याचे नुकसान
Dharur Social Media News
Dharur Social Media Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

अतुल शिनगारे

धारूरः सध्या सोशल मीडियावर राजकीय नेत्यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकणे,  आपल्या नेत्याची बाजू मांडणे याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, याच उत्साहाच्या भरात काही कार्यकर्ते विरोधी विचारांच्या व्यक्तींवर शिवराळ भाषेत टीका करणे, अलील व अपमानास्पद कमेंट करणे आणि वैयक्तिक पातळीवर जाऊन आरोप करण्याचे प्रकार करत आहेत.

आपल्या नेत्याप्रती निष्ठा दाखवण्याच्या प्रयत्नात हे कार्यकर्ते नेत्यांचीच राजकीय कोंडी करत असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.एखाद्या नेत्याच्या विरोधात सोशल मीडियावर एखादी पोस्ट व्हायरल झाली की, संबंधित मुद्द्याला वस्तुनिष्ठपणे उत्तर देण्याऐवजी काही समर्थक थेट शिवीगाळ आणि वैयक्तिक टीकेचा मार्ग स्वीकारतात. परिणामी, मूळ विषय बाजूला पडतो आणि वादाला वेगळेच वळण मिळते.

Dharur Social Media News
Bhagwan Gad Mahant: तेलंगणात जन्‍म, अध्यात्‍माकडे ओढ, भगवानगडावर शिक्षण, कोण आहेत गडाचे चतुर्थ महंत कृष्‍णा महाराज शास्त्री?

आपण आपल्या नेत्याचे किती निष्ठावान समर्थक आहोत, हे दाखवण्याच्या नादात त्या नेत्याची प्रतिमा जनमानसात कशी निर्माण होत आहे, याचा विचार मात्र केला जात नाही. नेत्याच्या कामाचे समर्थन करण्याऐवजी विरोधकांना अपमानित करण्यावर भर दिला जात असल्याने राजकीय चर्चेची पातळीही घसरत आहे.या प्रकारांमुळे केवळ राजकीय पक्षांतील संघर्ष वाढत नाही, तर जातीपातीचे मुद्दे पुढे करून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होण्याची भीतीही आहे.

वैचारिक मतभेदांचे रूपांतर वैयक्तिक शत्रुत्वात होत असल्याने सामाजिक सलोखा आणि परस्परांतील विश्वासाला तडा जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बीड, माजलगाव, वडवणी, धारूर, अंबाजोगाई, केज, परळी, आष्टी, पाटोदा आणि शिरूरसह जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये राजकीय घडामोडींवर सोशल मीडियातून प्रतिक्रिया उमटत असतात. मात्र, या प्रतिक्रियांमध्ये संयम सुटला आणि मर्यादा ओलांडल्या गेल्या, तर त्याचा परिणाम संबंधित नेत्यांच्या राजकीय वाटचालीवरही होऊ शकतो.

राजकीय नेत्यांची ताकद केवळ त्यांच्या समर्थकांच्या संख्येवर ठरत नाही, तर समाजातील सर्व घटकांशी त्यांचे संबंध कसे आहेत, जनतेमध्ये त्यांच्याविषयी किती विश्वास आहे आणि ते मतभेदांना किती परिपक्वतेने सामोरे जातात, यावरही ठरते. अशा परिस्थितीत समर्थकांकडून होणारी वैयक्तिक बदनामी नेत्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवू शकते. भविष्यातील राजकीय संधी, पक्षातील जबाबदाऱ्या आणि जनतेतील विश्वास यांनाही अशा प्रकारांचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नुकसान मात्र जिल्ह्याचे!

बीड जिल्ह्याच्या राजकारणात नेतृत्व, पक्षीय वर्चस्व आणि समर्थकांमधील स्पर्धा यांची चर्चा नेहमीच होत असते. मात्र, ‌‘आमचा नेता की तुमचा नेता‌’ या संघर्षात जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न मागे पडत असतील, तर ही बाब अधिक चिंताजनक आहे. पालकमंत्रिपद, मंत्रिपदाच्या संधी, जिल्ह्याच्या विकासासाठी निधी आणि महत्त्वाच्या प्रश्नांवर प्रभावी पाठपुरावा यांसारख्या विषयांवर जिल्ह्याला ठोस लाभ मिळणे आवश्यक आहे. नेत्यांच्या समर्थनार्थ होणाऱ्या आभासी लढाया आणि परस्परांवरील आरोप-प्रत्यारोपांत राजकीय ऊर्जा खर्च होत असेल, तर विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित कोण करणार, हा प्रश्न उपस्थित होतो.

Dharur Social Media News
Jalna Water Shortage : पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करा : जिल्हाधिकारी मित्तल

राजकीय मतभेद असणे लोकशाहीचे वैशिष्ट्‌‍य आहे. विरोधकांवर टीका करणे, त्यांच्या भूमिकेतील त्रुटी दाखवून देणे आणि आपल्या नेत्याच्या कामगिरीची बाजू मांडणे यात गैर काहीच नाही. मात्र, टीका मुद्द्यांवर असावी; व्यक्ती, कुटुंब किंवा जातीला लक्ष्य करणारी नसावी. सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्टला उत्तर देणे, प्रत्येक टीकेला प्रतिटिका करणे आणि प्रत्येक वादात आपल्या नेत्याला ओढणे ही राजकीय निष्ठा नव्हे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news