Tuljapur Tulja Bhavani Temple : हजारो भाविकांच्या उपस्थितीत तुळजाभवानी मातेचे सीमोल्लंघन

तुळजापूर : प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणेसमोर हाणामारी, एक जखमी
Tuljapur Tulja Bhavani Temple
Tuljapur Tulja Bhavani Temple pudhari photo
Published on: 
Updated on: 

डॉ. सतीश महामुनी

तुळजापूर : हजारो भाविकांच्या उपस्थितीत पहाटे सूर्योदयाच्या वेळी तुळजाभवानी मंदिरात पारंपरिक सीमोल्लंघन सोहळा भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला. मात्र, या धार्मिक सोहळ्यादरम्यान प्रशासन आणि पोलीस कर्मचाऱ्यांसमोरच दोन गटांत हाणामारी झाली. यात एक जण गंभीर जखमी झाला. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही हा प्रकार घडल्याने मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शारदीय नवरात्र महोत्सवातील धार्मिक विधी आणि आजाबळीचा कार्यक्रम संपल्यानंतर सीमोल्लंघन सोहळ्याची तयारी करण्यात आली. भिंगार, जिल्हा अहिल्यानगर येथून आलेली मानाची पलंग पालखी सायंकाळी साडेसातच्या सुमारास वाजतगाजत शुक्रवार पेठेतील परंपरागत ठिकाणी दाखल झाली. नगराध्यक्ष विनोद गंगणे आणि उपनगराध्यक्ष रामचंद्र रोचकरी यांनी शहराच्या वतीने मानकऱ्यांचे स्वागत केले.

Tuljapur Tulja Bhavani Temple
Jalna Water Shortage : जिल्ह्यावर भीषण पाणी टंचाईचे संकट

पालखीच्या स्वागतासाठी संस्कार भारती आणि संभाजी तरुण मंडळाच्या वतीने आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. मंदिरात तुळजाभवानी देवीची पूजा आणि आरती करण्यात आली. त्यानंतर देवीच्या मूळ मूर्तीला १०८ सुती साड्यांची दिंड गुंडाळण्यात आली. देवीची मूर्ती पालखीत विराजमान करून अहिल्यानगरहून आलेल्या मानाच्या पालखीतून सीमोल्लंघनासाठी मंदिराबाहेर आणण्यात आली.

पालखीची मंदिराभोवती एक प्रदक्षिणा घालण्यात आली. त्यानंतर मंदिर परिसरातील पिंपळाच्या पारावर देवीची आरती करण्यात आली. यावेळी साखरभाताचा नैवेद्य दाखवून मानाच्या आरत्या करण्यात आल्या. धार्मिक परंपरेनुसार, महिषासुर या दैत्यासोबत नऊ दिवस चाललेल्या घनघोर युद्धानंतर देवीने त्याचा वध केला. युद्धातील श्रमानंतर देवी विश्रांतीसाठी मंचकी निद्रेला जाते, अशी मान्यता आहे. सीमोल्लंघन सोहळ्यानंतर देवीच्या मंचकी निद्रेला प्रारंभ झाला. त्यानंतर देवीची मूर्ती सिंहाच्या गाभाऱ्यातील मानाच्या तेली लाकडी पलंगावर विराजमान करण्यात आली.

Tuljapur Tulja Bhavani Temple
Jalna Illegal Sand Mining : दुधना नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणारा हायवा पकडला

या सोहळ्यास आमदार तथा मंदिर संस्थानचे विश्वस्त राणाजगजितसिंह पाटील, पोलीस अधीक्षक रितू खोकर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, तहसीलदार अरविंद बोळंगे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर पाटील, महंत तुकोजी बुवा, महंत चिलोजी बुवा, महंत हमरोजी बुवा, महंत वाकोजी बुवा, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम, पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे आणि उपाध्ये पुजारी मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

बंदोबस्त असूनही हाणामारी...

सीमोल्लंघन सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि शेकडो पोलीस कर्मचारी तैनात होते. मंदिरातील सुरक्षा रक्षकही बंदोबस्तावर होते. असे असतानाही दोन गटांत हाणामारी होऊन एक जण गंभीर जखमी झाल्याने सुरक्षा व्यवस्थेच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. गर्दीचे नियोजन आणि संभाव्य अनुचित प्रकार रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबाबतही चर्चा सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news