गजानन चौकटे
गेवराई : ज्या उसाच्या पिकातून घराला आर्थिक आधार मिळेल, कुटुंबाच्या गरजा भागतील आणि वर्षभराच्या कष्टाचे चीज होईल, अशी आशा बाळगली, तोच ऊस पाण्याअभावी डोळ्यांदेखत जळून गेला. शेतात उभ्या असलेल्या वाळलेल्या उसाकडे पाहताना शेतकरी सुरेश नरवडे यांच्या मनातील वेदना शब्दांतून बाहेर पडल्या. ‘अब इसको काडी लगाने की.... जाळून टाकायचे!’ असे हताशपणे सांगताना त्यांच्या बोलण्यातून केवळ एका पिकाचे नुकसान नव्हे, तर वर्षभराच्या कष्टांची राख झाल्याची वेदना जाणवत होती. शेतकऱ्याच्या काळजाला चटका लावणारे हे वास्तव केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यान समोर आले.
दुष्काळग्रस्त भागातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने शुक्रवारी गेवराईसह तालुक्यातील विविध ठिकाणी पाहणी केली. अर्धमसला येथील गट क्रमांक 331 व 336 मधील संतोष बाबुराव नरवडे, जानकीराम रामभाऊ नरवडे आणि सुरेश बाबुराव नरवडे यांच्या शेतांची पाहणी करण्यात आली. पाण्याअभावी पिकांची झालेली अवस्था पाहताना शेतीसमोरील संकटाची तीव्रता लक्षात येत होती.
शेतकरी पेरणीपासून पीक काढणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर पैसा आणि घाम खर्च करतो. बियाणे, खते, औषधे, मशागत आणि मजुरीचा खर्च करून पीक जगवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, निसर्गाने साथ सोडली आणि पाणीच उपलब्ध झाले नाही, तर या साऱ्या कष्टांचे करायचे काय? अर्धमसला परिसरात पाण्याअभावी जळून गेलेल्या उसाची अवस्था पाहता हाच प्रश्न उपस्थित होत आहे.उसाचे पीक डोळ्यांसमोर वाळत असताना शेतकऱ्याने पाहिलेली स्वप्नेही जणू कोमेजून गेली आहेत.
ज्या पिकाकडून उत्पन्नाची अपेक्षा होती, त्याच पिकाच्या काढणीसाठी आता खर्च करणेही कठीण झाले आहे. पीक जगवता आले नाही आणि काढणी करूनही अपेक्षित उत्पादन मिळणार नसेल, तर कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.‘या उसाला आता काडी लावून जाळून टाकायचे,’ या सुरेश नरवडे यांच्या उद्गारांतून शेतकऱ्यांची अगतिकता व्यक्त झाली. शेतकऱ्याच्या आयुष्यात पीक जळणे म्हणजे केवळ शेतातील हिरवळ नष्ट होणे नव्हे; तर त्यासाठी केलेली मेहनत, खर्च आणि उत्पन्नाची आशा यांनाही मोठा धक्का बसणे होय.
दुष्काळाची प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाने गेवराई तालुक्यातील विविध ठिकाणी भेटी देत शेतीची पाहणी केली. अर्धमसला येथील शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पिकांची अवस्था आणि पाण्याअभावी निर्माण झालेल्या अडचणींची माहिती घेण्यात आली. या पाहणीमुळे शेतकऱ्यांच्या व्यथा आणि शेतीसमोरील संकट शासनाच्या निदर्शनास येण्याची अपेक्षा आहे. केंद्रीय पथकात श्री. मुक्तानंद अग्रवाल, संयुक्त सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी व शेतकरी कल्याण विभाग; सुनील कुमार दुबे, उपसंचालक, डॉ. जसपाल सिंह, सल्लागार, ग्रेड-2, नीती आयोग आणि डॉ. साक्षी भदोरिया, पशुधन अधिकारी, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभाग यांचा समावेश होता.
यावेळी आमदार विजयसिंह पवार, विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखडे, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे, उपविभागीय अधिकारी शुभम पवार, उपविभागीय कृषी अधिकारी श्रद्धा भवारी, तहसीलदार गीतांजली गरड, तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी, मंडळ अधिकारी जितेंद्र लेंडाळ, सहाय्यक कृषी अधिकारी प्रकाश वाघमारे, तलाठी व ग्रामसेवक उपस्थित होते.
पिकांसोबत पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर
गेवराई येथील शेतकरी मदन रामभाऊ मोटे यांच्या तूर आणि कपाशी पिकांची पाहणी करून पथकाने जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊस नसल्यामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. विहिरीतील पाणी आटल्याने पिण्याच्या पाण्यासाठी स्वखर्चाने टँकर मागवावा लागत असल्याची व्यथा मोटे यांनी पथकासमोर मांडली. परिसरातील अन्य शेतकऱ्यांनीही ऊस पीक जळून गेल्याचे सांगितले.पिकांसाठी पाणी उपलब्ध नसणे, विहिरी आटणे आणि पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागणे, यामुळे शेतीसह दैनंदिन जीवनावरही गंभीर परिणाम होत असल्याचे या संवादातून स्पष्ट झाले.
आता शासनाच्या मदतीकडे शेतकऱ्यांच्या नजरा
दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना केवळ पाहणीच्या आश्वासनावर न थांबता प्रत्यक्ष मदतीची अपेक्षा आहे. पाण्याअभावी जळून गेलेल्या पिकांचे नुकसान लक्षात घेऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, अशी भावना परिसरात व्यक्त होत आहे. केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर नुकसान आणि दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन शासन कोणते निर्णय घेते, याकडे शेतकरी डोळे लावून बसले आहेत.