Crime News pudhari photo
बीड

Beed crime : गेवराईत हॉटेलमध्ये तरुणाला मारहाण; तरुण जखमी

गेवराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

पुढारी वृत्तसेवा

गेवराई: तालुक्यातील अंबिकानगर, तलवडा येथील २२ वर्षीय साईराज प्रकाश पवार या तरुणाला गेवराई येथील पंढरी हॉटेलमध्ये चहा घेत असताना त्याच्या मेव्हण्यासह चुलत भावाने लोखंडी पाईप व खुर्चीने मारहाण केल्याची तक्रार गेवराई पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या घटनेत साईराज जखमी झाला असून, त्याच्या दुचाकीचेही नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साईराज प्रकाश पवार (वय २२, रा. अंबिकानगर, तलवडा, ता. गेवराई) हा आपल्या आजीसोबत राहून शेती व्यवसाय करतो. दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास साईराज हा त्याचा मित्र समीर सय्यद याच्यासोबत गेवराई येथील पंढरी हॉटेलमध्ये चहा घेत बसला होता.यावेळी त्याचा मेव्हणा अर्जुन भिवाजी सुतार आणि चुलत भाऊ सुदर्शन कचरू सुतार (दोघे रा. कोल्हेर, ता. गेवराई, जि. बीड) हे तेथे आले.

त्यानंतर काही कारणावरून साईराजसोबत वाद झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.वाद वाढल्यानंतर अर्जुन सुतार याने शॉकअपचा स्टीलचा पाईप काढून साईराजच्या छातीवर, हातावर, मांडीवर व डोक्यावर मारल्याचे, तर सुदर्शन सुतार याने हॉटेलमधील खुर्चीने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

यावेळी साईराजचा मित्र समीर सय्यद याने मध्यस्थी करून भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अर्जुन सुतार याने साईराजला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. तसेच दोन्ही जणांनी हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या साईराजच्या दुचाकीचे शॉकअपच्या पाईपने नुकसान करून तेथून निघून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

मारहाणीत जखमी झालेल्या साईराजला त्याचा मित्र समीर सय्यद याने गेवराई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी बीड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

उपचार घेतल्यानंतर साईराजने गेवराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून अर्जुन भिवाजी सुतार आणि सुदर्शन कचरू सुतार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास गेवराई पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT