Beed Kej bus stand fraud
केज : केज येथील बस स्थानकावर एका ६५ वर्षीय वृद्ध प्रवाशाची गोड बोलून फसवणूक करण्यात आली. अनोळखी व्यक्तीने रुद्राक्ष देत वृद्धाला बोलण्यात गुंतवले आणि त्याच्या हातातील ११ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी काढून घेतली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ३ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० वाजता लातूर जिल्ह्यातील रामेश्वर येथील सेवानिवृत्त कर्मचारी शिवाजी पंढरीनाथ बळवंत हे आपल्या मुलगी निर्गुणा माने यांच्यासोबत धारूरला जाण्यासाठी केज बस स्थानकावर आले होते. बसची चौकशी करत असताना एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या जवळ आली. त्याने शिवाजी बळवंत यांच्या हातात रुद्राक्ष ठेवले आणि त्यांना बोलण्यात गुंतवले. बोलण्यात गुंतवून, अप्रामाणिकपणे त्याच्या हातातील ११ ग्रॅम वजनाची, अंदाजे ५४ हजार रुपये किमतींची सोन्याची अंगठी काढून घेतली.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शिवाजी बळवंत आणि त्यांची मुलगी निर्गुणा माने यांनी त्या व्यक्तीचा शोध घेतला, मात्र तो मिळून आला नाही. या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय बिक्कड तपास करत आहेत.