

केज : केज-मांजरसुंबा रस्त्यावरील सारूळ फाट्याजवळ मंगळवारी (दि.29) रात्री एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तबला वादक भागवत संपत अडागळे (वय ४५, रा. कानडीघाट, ता. बीड) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भागवत अडागळे हे सारूळ फाट्याजवळील रेणुका कला केंद्रावर तबला वादक म्हणून काम करत होते. मंगळवारी रात्री ते कला केंद्राजवळील एका हॉटेलमध्ये जेवण करून परत येत होते. रस्ता ओलांडत असताना केजच्या दिशेने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बुधवारी सकाळी सहाय्यक फौजदार राजू वाघमारे आणि जमादार राजू वंजारे यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या ताब्यात दिला. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.