E-Peak inspection stopped due to server down
धारूर, पुढारी वृत्तसेवा : गतवर्षीपासून शासनाने शेतकऱ्यांसाठी ई-पीक पाहणी बंधनकारक केली आहे. कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर शेतकऱ्याने आपल्या शेतातील पीक मोबाईलवर नोंदवून अपलोड करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र या ऑनलाईन प्रक्रियेत सर्व्हर डाऊनची समस्या कायम असल्याने शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
तेलगाव परिसरातील शेतकरी सांगतात की, दररोज शेतात जाऊन मोबाईलवर ई-पीक पाहणी करण्याचा प्रयत्न केला जातो. पण वेळोवेळी सव्र्व्हर डाऊन झाल्याने माहिती नोंदवली जात नाही. परिणामी शेतकऱ्यांना आपले नित्याचे शेतीकाम बाजूला ठेवून पुन्हा पुन्हा शेतात जावे लागते, मात्र परतताना रिकाम्या हाताने, निराश चेहऱ्याने घरी यावे लागते. अनेक शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी अपूर्ण राहिल्याने त्यांना शासकीय योजनांचा लाभघेण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
शेतकरीवर्गाचा रोष व्यक्त होत असून, शासनाने ही प्रक्रिया शेतकऱ्यांच्या डोक्याला ताप देणारी ठरत असल्याने तत्काळ या बंधनकारक नियमाला स्थगिती द्यावी, अशी मागणी केली आहे. शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे की, शासनाचे उद्दिष्ट पीकपद्धतीची अचूक नोंद ठेवणे हे योग्य आहे. परंतु त्यासाठी जी ऑनलाईन पद्धत राबवली जाते आहे, ती तांत्रिकदृष्ट्या अपयशी ठरत आहे. त्यामुळे सर्व्हर डाऊनचा प्रश्न कायम असताना ई-पीक पाहणी बंधनकारक ठेवणे म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा आहे.
ग्रामीण भागातील इंटरनेट कनेक्टिव्हिटी, नेटवर्क समस्या, सव्र्व्हरवरील भार यामुळे दररोज शेतकरी हताश होऊन परतत आहेत. शेतकऱ्यांना योजनांचा लाभ द्यायचा असेल, तर शासनाने या प्रक्रियेचा पुनर्विचार करून पर्यायी सोपी पद्धत लागू करावी अशी मागणी तेलगाव परिसरासह संपूर्ण तालुक्यातील शेतकरी करत आहेत.