Drip Irrigation file photo
बीड

SC ST Farmer Subsidy : ठिबक-तुषार सिंचनासाठी ९० टक्क्यांपर्यंत अनुदान

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक; राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत महाडीबीटीवर अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

बीड : पाण्याचा काटेकोर वापर करून उत्पादन आणि उत्पादकता वाढविण्यासोबतच सिंचन क्षेत्र विस्तारण्याची संधी शेतकऱ्यांना उपलब्ध झाली आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजना – ‘प्रति थेंब अधिक पिक’ योजनेअंतर्गत ठिबक व तुषार सिंचनासाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना एकत्रितपणे ९० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

ठिबक आणि तुषार सिंचनामुळे उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करता येत असल्याने कमी पाण्यात अधिक क्षेत्र सिंचनाखाली आणण्यास मदत होते. सध्याच्या बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पाण्याची बचत आणि शेती उत्पादन टिकविण्याच्या दृष्टीने ही योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.

राष्ट्रीय कृषी विकास योजना – प्रति थेंब अधिक पिक, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना / डॉ. बाबासाहेब कृषी स्वावलंबन योजना या योजनांच्या एकत्रित अनुदानातून पात्र शेतकऱ्यांना ९० टक्क्यांपर्यंत अनुदान उपलब्ध होणार आहे.

ठिबक व तुषार सिंचनामुळे पिकांना आवश्यकतेनुसार आणि मोजून पाणी देता येते. परिणामी पाण्याचा अपव्यय कमी होऊन पिकांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण होते. तसेच तणांची वाढ नियंत्रित करण्यास मदत होत असल्याने शेतीवरील खर्च कमी करण्यास हातभार लागू शकतो.

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील पात्र शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ठिबक व तुषार सिंचन घटकासाठी अर्ज करावेत, असे कृषी विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.पाण्याची उपलब्धता हा शेतीसमोरील मोठा प्रश्न बनत असताना, सिंचनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी मिळणारे हे अनुदान शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या मोठा आधार ठरू शकते. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी योजनेची माहिती घेऊन वेळेत अर्ज करावा आणि ‘प्रति थेंब अधिक पिक’ या संकल्पनेतून शेती अधिक उत्पादनक्षम करण्यासाठी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT