बीड : सोलापूर-धुळे महामार्गावर मांजरसुंबा घाटात भरधाव वेगातील कंटेनरने डिझेलच्या टँकरला धडक दिल्याने तो पलटी झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता घडली. डिझेल लिकेज होऊन आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. परिसरातील ग्रामस्थांनी एका मार्गाने ही वाहतूक वळवली. यानंतर जवळपास दोन तासांनी ही आग आटोक्यात आणण्यात यश आले.
सोलापूर-धुळे महामार्गावर मांजरसुंबा घाट संपल्यानंतर कोळवाडी फाटा परिसरात भरधाव वेगातील कंटनेरने समोर चालत असलेल्या डिझेल टँकरला धडक दिली. यामुळे टँकरचालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर पलटी झाला. यावेळी टँकरमधून डिझेल लिकेज होत आग लागली.
डिझेल रस्त्यावर पसरल्याने रस्त्यावरसुद्धा आगीचे लोळ उठत होते. जवळपास दोन तास ही आग धुमसत होती. यानंतर गेवराई येथून अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर साडेसात वाजण्याच्या सुमारास ही आग अटोक्यात आणण्यात यश आले.
बीड ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मुदीराज, वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक सानप यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत करण्याबरोबरच परिसरात झालेली गर्दी नियंत्रणात आणली.
बीड अग्निशामक दलाचे वाहन नादुरुस्त
अपघात होऊन टँकरला आग लागल्यानंतर बीड ग्रामीण पोलिसांनी बीड येथीलच अग्निशामक दलाला माहिती दिली. परंतु या ठिकाणचे वाहन नादुरुस्त असल्याचे सांगण्यात आले. परिणामी आग विझवण्यासाठी जवळपास एक तासाहून अधिकचा विलंब झाला. यानंतर गेवराई येथे संपर्क करत तेथील वाहन येईपर्यंत आग धुमसत होती. अग्निशामक दलाच्या जवानांनी या ठिकाणी दाखल होत आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केल्यानंतरही आगीचे व धुराचे मोठे लोट आकाशात उडत असल्याचे प्रत्यक्षदर्शंनी सांगितले.