

वडीगोद्री : मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटिअरनुसार तीन महिन्यात मराठवाड्यात केवळ 98 कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यात आली आहेत. या दिरंगाईबाबत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी सरकारवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणी विषयी राज्य सरकार दुटप्पी भूमिका घेत आहे, असे जरांगे म्हणाले.
मराठा आरक्षणासाठी मुंबईत ऑगस्ट महिन्यात मनोज जरांगे यांनी केलेला आंदोलनानंतर 2 सप्टेंबर रोजी शासनाने हैदराबाद गॅझेटिअरनुसार आरक्षण देण्याचा जीआर काढला. या जीआरनुसार मराठवाड्यात गेल्या तीन महिन्यात केवळ 98 मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहेत.
हे प्रमाण अत्यल्प असल्याने आता जरांगे यांची सरकारने फसवणूक केली, अशी टीका होऊ लागली आहे. राज्य सरकारबरोबरच जरांगे यांच्यावरही मराठा समाजातून नाराजीचा सूर उमटत आहे. या विषयी शुक्रवारी मनोज जरांगे यांनी अंतरवाली येथे माध्यामांशी संवाद साधला.
जरांगे म्हणाले, मराठवाड्यात हैदराबाद गॅझेटिअरनुसार आतापर्यंत केवळ 98 कुणबी प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली आहेत, तर 594 अर्ज दाखल झाले आहेत. गंभीर बाब म्हणजे, संभाजीनगरमध्ये (औरंगाबाद) तर अजून एकही प्रमाणपत्र वितरित झालेले नाही. सरकारने हैदराबाद गॅझेटिअरचा जीआर काढला असला, तरी दुसरीकडे अर्ज केला असता अधिकारी अजून आदेशच आले नाहीत असे कारण देत आहेत.
ही सरकारची दुटप्पी भूमिका आहे. या निष्क्रियतेवर टीका करत जरांगे यांनी सरकारने आरक्षण प्रमाणपत्रासाठी गावा-गावात समित्या गठीत करून विशेष अभियान राबवावे, जेणेकरून मराठा समाजाला जलदगतीने कुणबी प्रमाणपत्रे मिळू शकतील, अशी मागणी केली.