Dharur News : शेतकरी संकटाच्या खाईत, लोकप्रतिनिधी 'ट्रेंडिंग'च्या गर्तेत !  file photo
बीड

Dharur News : शेतकरी संकटाच्या खाईत, लोकप्रतिनिधी 'ट्रेंडिंग'च्या गर्तेत !

मदतीचा हात देण्याऐवजी सोशल मीडियावरील प्रसिद्धीचा हव्यास ; धारूरच्या जनतेचा संतप्त सवाल

पुढारी वृत्तसेवा

Dharur News : Farmers in crisis, people's representatives in the midst of 'trending'

अतुल शिनगारे

धारूर, पुढारी वृत्तसेवाः ऐन खरिपाच्या हंगामात पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजा पूर्णपणे कोलमडून गेला आहे. पिके डोळ्यांसमोर करपून जात असताना, जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

आभाळाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी एका एका पावसाच्या थेंबासाठी आणि शासनाच्या मदतीसाठी तडफडत असताना, दुसरीकडे लोकप्रतिनिधी मात्र सोशल मीडियावर 'ट्रेंडिंग' राहण्याच्या शर्यतीत मन असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. शेतकरी संकटाच्या खाईत लोटला गेला असताना नेत्यांचा हा फोटोशूटचे आणि प्रसिद्धीचा हव्यास पाहून सर्वसामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सध्या सोशल मीडियावर एका राजकीय व्यक्तीच्या जुन्या चित्रपटातील दृश्यांसोबत स्वतःचे फोटो जोडून पोस्ट प्रसारित करण्याचा सपाटा सुरू आहे. कार्यकर्त्यांकडून यावर लाईक्स, कमेंट्स आणि शेअर्सचा वर्षाव मिळवण्यासाठी जणू स्पर्धाच लागली आहे. परंतु, "एखाद्या आमदाराने अथवा लोकप्रतिनिधीने शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्याच्या करपलेल्या पिकांचे आणि त्याच्या डोळ्यांतील अश्रूचा फोटो कधी सोशल मीडियावर टाकून शासनाचे लक्ष वेधले आहे का?" असा खरमरीत सवाल आता धारूर तालुक्यातील शेतकरी विचारत आहेत.

पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली

आहे, लागवडीचा खर्च पाण्यात गेला असून कर्जाचा डोंगर समोर उभा आहे. अशा भीषण परिस्थितीत लोकप्रतिनिधींनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची आसवे पुसणे, पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला देणे आणि तातडीने मदत मिळवून देणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्ष कामाचा पाठपुरावा करण्याऐवजी केवळ डिजिटल जगात 'हीरो' ठरण्याचा प्रयत्न सुरू आहे.

सोशल मीडियावरील लाईक्सपेक्षा शेतकऱ्यांच्या जगण्याचा प्रश्न कितीतरी पटीने मोठा आहे, याचे भान नेत्यांना उरलेले नाही का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. सोशल मीडियावरील लाईक्सची संख्या वाढत असली, तरी करपणाऱ्या पिकांची चिंता गडद होत आहे. आगामी काळात नेत्यांनी या प्रसिद्धीच्या हव्यासातून बाहेर पडून बळीराजाला सावरण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अन्यथा जनतेचा हा उद्रेक राजकीय गणिते बिघडवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही नागरिक देत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT