सिमेंटचा ट्रक दरीत कोसळला pudhari photo
बीड

Dharur Ghat accident : सिमेंटचा ट्रक दरीत कोसळला

धारूर घाटात अपघातांची मालिका थांबेना; रुंदीकरणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून रखडला

पुढारी वृत्तसेवा

धारूर ः शेगाव-पंढरपूर पालखी मार्गावरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 सी वर असलेल्या धारूर-तेलगाव मार्गावरील धारूर घाटात अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. सोमवार (16 मार्च) रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास आंध्रप्रदेशातून तेलगावकडे जाणारा सिमेंटने भरलेला मालवाहतूक ट्रक अवघड वळणावरून थेट दरीत कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही; मात्र ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

सध्या शेगाव-पंढरपूर पालखी मार्गावर वाहतुकीचा मोठा ताण वाढला आहे. मात्र धारूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते धुनकवड पाटी हा सुमारे 12 किलोमीटरचा रस्ता अद्याप अरुंदच ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये जवळपास 3 किलोमीटरचा धोकादायक घाट असून एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला अरुंद वळणे असल्याने या मार्गावर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

आठवड्याला दोन ते तीन वाहने दरीत कोसळण्याच्या घटना घडत असल्याचे वाहनचालक सांगतात.मंगळवारी सिमेंट वाहतूक करणारा सोळा चाकी ट्रक हा आंध्रप्रदेशातून तेलगावकडे येत असताना धारूर घाटातील एका धोकादायक वळणावर नियंत्रण सुटले. ट्रकने तटरक्षक भिंत तोडत थेट दरीत कोसळत भीषण अपघात झाला.

या अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात वाहनधारक व नागरिकांची गर्दी झाली होती.या घाटात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे वाहनचालक व प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घाटाचे रुंदीकरण आणि सुरक्षेच्या उपाययोजना अद्याप प्रलंबित असल्याने प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन या मार्गावरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या घाटाचे तत्काळ रुंदीकरण करून सुरक्षित प्रवासाची व्यवस्था करावी, अशी मागणी वाहनचालक, प्रवासी तसेच स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे.रूंदीकरणाचे काम मंजूर झाल्याचे सांगितले जात असले तरी ते प्रत्यक्षात कधी सुरू होणार ? हा प्रश्न आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष; प्रवाशांचा जीव धोक्यात

धारूर घाटातील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसतानाही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे याकडे गंभीर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. रोज अपघात घडत असतानाही रस्त्याचे रुंदीकरण, तटरक्षक भिंती आणि सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या चालक आणि प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

घाटातील समस्या कधी दूर होणार आणि सुरक्षित प्रवास कधी मिळणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तत्काळ लक्ष देऊन धारूर घाटाचे रुंदीकरण करून वाहतूक सुरक्षित करावी, अशी मागणी प्रवासी व वाहनचालकांकडून जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT