Krishna Rathod Death Case Majalgaon
माजलगाव : माजलगाव तालुक्यातील मालीपरगाव येथील कृष्णा गणपत राठोड यांच्या मृत्यू प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मृत कृष्णा राठोड यांचे भाऊ बंडू गणपत राठोड यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी बीड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांकडे लेखी निवेदन सादर केले आहे. तसेच या प्रकरणातील आरोपींना १५ दिवसांच्या आत अटक न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
कृष्णा गणपत राठोड हे ७ जुलै २०२६ रोजी अचानक बेपत्ता झाले होते. त्यांचा शोध घेण्यासाठी नातेवाईकांकडे तसेच परिसरात विचारपूस करण्यात आली; मात्र त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. कुटुंबीयांकडून त्यांचा शोध सुरू असतानाच १३ जुलैरोजी राजेगाव शिवारातील गणेश कचरे यांच्या शेतात कृष्णा राठोड यांचा मृतदेह आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच माजलगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी १४ जुलै २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे बंडू राठोड यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
मात्र, गुन्हा दाखल होऊनही या प्रकरणाचा तपास अपेक्षित गतीने होत नसल्याचा आरोप बंडू राठोड यांनी केला आहे. कृष्णा राठोड यांच्या मृत्यूमागील नेमके कारण काय, तसेच या घटनेला कोण जबाबदार आहे, याचा सखोल तपास करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या प्रकरणातील संशयित आरोपींची चौकशी करून दोषींना तातडीने अटक करावी आणि कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. पोलिसांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तपासाला वेग द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, १५ दिवसांच्या आत प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित आरोपींना अटक करण्यात आली नाही, तर आत्मदहन करण्याचा इशारा बंडू राठोड यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे आता पोलीस प्रशासन कोणत्या पद्धतीने पाहते आणि तपासात काय निष्पन्न होते, याकडे मालीपरगावसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.