धारूर : धारूर शहर व परिसरात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) अंतर्गत सुरू असलेल्या वीजपुरवठ्यातील गंभीर अनियमिततेमुळे शेतकरी, व्यापारी व सामान्य नागरिक हैराण झाले आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता तासन्तास वीज खंडित ठेवली जात असल्याने शेतीपंप, व्यावसायिक आस्थापना व घरगुती कामकाज पूर्णतः विस्कळीत झाले असून यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने वीज विभागाच्या कारभाराची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. सततच्या वीज लपंडावामुळे संतप्त झालेल्या शेतकरी व नागरिकांनी महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन करत वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी केली.
शहर व शेत परिसरातील अनेक भागांमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून, पाणीपुरवठा, पिकांचे सिंचन तसेच छोटे व्यावसायिक उद्योग अडचणीत आले आहेत. यासोबतच शहरातील सुमारे 70 ते 80 टक्के पथदिवे बंद अवस्थेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी अपघात तसेच गुन्हेगारी घटनांचा धोका वाढला आहे. काही ठिकाणी विद्युत तारा सैल अवस्थेत किंवा जमिनीवर लटकलेल्या असल्याने नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.
दरम्यान, मुख्यालय दिन असतानाही सहाय्यक कार्यकारी अभियंता लक्ष्मण मोर्ये कार्यालयात गैरहजर असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. अखेर कनिष्ठ अभियंते जोगदंड व चव्हाण यांनी दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.या प्रकरणाची तातडीने चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सादेक इनामदार व शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे.