Crowd of people at Beed bus station at night
बीड, पुढारी वृत्तसेवा बीड बसस्थानकात रात्रभर बसेसची ये-जा असते, त्यामुळे प्रवाशांचीही वर्दळ असते. परंतु यामध्ये बीड शहरातील हौशा-नवशांची देखील भर पडत असून रात्रभर सुरु राहणाऱ्या कॅन्टीनमुळे या परिसरात गर्दी वाढत आहे. यातून प्रवाशांच्या सुरक्षेला देखील धोका निर्माण झाला आहे. यावर उपाययोजना कोण करणार? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
बीड शहरातील बसस्थानक परिसरात चालणारे अवैध प्रकार जगजाहीर झाले आहेत. पोलिस आणि बसस्थानक प्रशासन याची जबाबदारी एकमेकांवर ढकलून मोकळे होत असले तरी यामुळे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात येत आहे. सोलापूर-धुळे महामार्गावर मध्यवर्ती स्थानक म्हणून बीडची ओळख आहे. या बसस्थानकात रात्रीच्या वेळी देखील मोठ्या प्रमाणात बसेस ये-जा करतात.
त्यांच्या सुरक्षेसाठी केवळ एक सुरक्षा रक्षक तैनात असतो, तो देखील कोणत्या कोपऱ्यात बसलेला असतो, त्यालाच माहीत. तर दुसरीकडे बसेस न मिळणारे, उशिराने बस असलेले अनेक प्रवासी बसस्थानकातच झोप लेले असतात. त्यांच्याकडील रोख रक्कम, दागिन्यांची चोरी होऊ शकते, याबरोबरच एखादी अप्रिय घटना देखील घडू शकते.
परंतु त्याबाबत बसस्थानक प्रशासन आणि पोलिस प्रशासने फारसे गंभीर नसल्याचे दिसते. यात भर पडते ती रात्रभर उघड्या राहणाऱ्या कॅन्टीनमुळे. बीड शहरातील हॉटेल्स रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू असतात. त्यानंतर बहुतांश बाजारपेठ बंद होते. परंतु बसस्थानकातील कॅन्टीन मात्र रात्रभर सुरू असते. प्रवाशांच्या सोयीसाठी ही कॅन्टीन उशिरापर्यंत सुरू ठेवली जात असावी, असे दिसते.
परंतु याचा फायदा बीड शहरातील हौशे-गवशे लोक उचलत असल्याचे दिसते. या ठिकाणी रात्री उशीरा चहा, नाष्टा, जेवण उपलब्ध असते. अडचणीत आलेल्या मंडळींसाठी हा नक्कीच दिलासा आहे. परंतु रिकामे लोक येऊन रात्रीच्या वेळी या कॅन्टीनला आपला अड्डा बनवत आहेत. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेला देखील धोका निर्माण झाला असून यावर आता बसस्थानक प्रशासन व पोलिसांनीच उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
पोलिस प्रशासनाशी पत्र्यवहार केला : पवार त्यांच्यापासून प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही पोलिस प्रशासनास पत्रव्यवहार केलेला आहे. बसस्थानकात रात्रभर बसेस ये-जा करत असल्याने कॅन्टीन सुरू असते. परंतु त्या ठिकाणी कोणी यावे, कोणी नाही, हे आम्ही ठरवू शकत नाही. प्रवाशांना कोणतीही अडचण येणार नाही यासाठी आम्ही काळजी घेतो. बसस्थानक परिसरात सीसीटीव्ही कार्यान्वीत आहेत. याबरोबरच सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात आलेले असतात अशी माहिती आगारप्रमुख पवार यांनी दिली.
बसस्थानक परिसरातही हवी पेट्रोलिंग बीड बसस्थानकाचा परिसर शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतो. बसस्थानक व बसस्थानकाच्या पाठीमागील रस्त्यावर अनेकदा मारामारीच्या घटना घडलेल्या आहेत. त्यातून एखादी मोठी दुर्घटना घडू नये याकरिता या भागात विशेष पेट्रोलिंग सुरू करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.