Cotton farmers in the taluka have been hit hard by heavy rains this year.
गजानन चौकटे
गेवराई, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर यंदा अतिवृष्टीचा जबरदस्त फटका बसला आहे. पेरणीनंतर सुरुवातीला पिकाची वाढ चांगली दिसत होती; मात्र ऑगस्टपासून झालेल्या सलग पावसामुळे शेतातील ओलावा प्रचंड वाढला. झाडांची वाढ खुंटली, बोंडं दिसायला मोठी असली तरी आतील कापसाला तजेला राहिला नाही. सर्वात गंभीर म्हणजे वजनात १५ ते ४० टक्क्यांची घट झाल्यामुळे अनेकांचे उत्पादन थेट अर्ध्यावर आले आहे. सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत असताना 'पांढऱ्या सोन्या'ला मात्र दरवाढ कधी मिळणार, असा प्रश्न शेतकरी चिंतेने उपस्थित करीत आहेत. गेल्या वर्षी एकरी ८ ते १० क्विंटल मिळणारे उत्पादन यंदा ४ ते ६ क्विंटलवर येऊन ठेपल्याची व्यथा शेतकरी धनंजय उबाळे यांनी सांगितले.
कापसाचे बियाणे, खते, औषधे, फवारणी, मजुरी या सर्वांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असल्यामुळे एकरी ३० ते ३५ हजार रुपये खर्च येत आहे. उत्पादन कमी आणि खर्च जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीच राहत नाही. त्यातच बाजारातील दरांचा अनिश्चित खेळ शेतकऱ्यांची अडचण अधिक वाढवतो. सरकारने कापसाचा दर ८१०० रुपये प्रति क्विंटल जाहीर केलेला असतानाही प्रत्यक्ष बाजारात ७१०० ते ७३०० रुपयांपेक्षा जास्त भाव मिळत नसल्याचा आरोप शेतकरी करतात. व्यापारी गुणवत्ता घटल्याचे कारण देतात, पण शेतकरी म्हणतात की, कापूस खराब नाही, पाऊस जास्त झाला म्हणून आम्हाला भावातच मार बसतो.
दररोजच्या दरातील २००३०० रुपयांच्या चढ-उतारामुळे शेतकरी विक्रीच्या निर्णयात प्रचंड संभ्रमात पडतात. सरकारी खरेदी उशिरा सुरू झाल्यामुळे कापूस साठवून ठेवणं कठीण झाले आहे. शेतातील ओलावा, गोदामाचा खर्च आणि दरघटकतीमुळे अनेकांना तोटा पत्करूनच तातडीने कापूस विकावा लागत आहे. "पिक उभं होतं, वजन गेलं, भाव कमी झाला आणि सरकारी खरेदी लांबली आम्ही करावं तरी काय?" असा उद्विग्न सवाल शेतकरी करत आहेत. अद्याप खरेदी केंद्र सुरु झाले नसल्याने शेतकरी पूर्णपणे बाजारभावावरच अवलंबून आहेत. खर्च वाढलेला, घरखर्चाचा ताण वाढत चाललेला आणि उत्पन्न हातात न पडल्याने अनेकांना नाईलाजाने सात हजारांच्या आसपासच कापूस विकावा लागत आहे. यंदाच्या हंगामात कागदावर कापूस अजूनही 'पांढरे सोने' असले तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या सोन्यावर अतिवृष्टीचे काळे ढग दाटले आहेत. मेहनत करूनही हाताला काहीच न लागणं ही शेतकऱ्यांच्या व्यथेची खरी कहाणी ठरत आहे.
यंदा अतिवृष्टी झाल्याने होत्याचं नव्हतं झालं. पावसाने कापूस खराब झाला. वेचणीसाठी जास्तीचे पैसे देऊन ही मंजूर मिळत नाहीत. कारण जिकडे मंजुरी जास्त तिकडे ते जातात. घर चालवणे अवघड झाले आहे. सरकारला शेतकऱ्यांच्या व्यथा कधी कळणार? यंदा अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे बेहाल झाले.राम आटपळे, शेतकरी माटेगाव