Ajit Pawar (file photo)
बीड

Ajit Pawar Beed Visit | ऊसतोड कामगाराचा मृत्यू झाल्यास १० लाखांची मदत देण्याचा विचार, अजित पवारांची माहिती

बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेवरही अजितदादा बोलले

दीपक दि. भांदिगरे

Ajit Pawar Beed Visit

बीड : ऊसतोड कामगाराचा मृत्यू झाल्यास दहा लाख रुपये मदत देण्याबाबत राज्य सरकार विचार करणार आहे. विलासराव देशमुख साखर कारखान्याने गतवर्षी सर्व ऊस हार्वेस्ट्ररच्या माध्यमातून तोडला. राज्यातील ऊसतोड कामगारांची ही शेवटची पिढी ठरावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. भविष्यात ऊसतोड मजुरांना इतर व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देऊ, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी (दि.७ ऑगस्ट) सांगितले. ते बीडमधील ऊसतोड कामगारांच्या मेळाव्यात बोलत होते.

गोपीनाथ मुंडे यांनी ऊसतोड मजुरांसाठी खूप काम केले. त्यांच्या नावाने ऊसतोड कामगाराचे महामंडळ स्थापन केले. मला आता धनंजय मुंडे यांनी सांगितले की हे महामंडळ सामाजिक न्याय विभागाकडे असून ते आता नियोजनकडे घ्या. पण यासाठी मला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना बोलावे लागेल, असे अजित पवार म्हणाले.

बीडचा सर्वांगीण विकास व्हावा. मी इथला रस्ते, पाणी, रोजगार याचा प्रश्न सोडवणार आहे. मी रेल्वेमंत्री यांना बोललो आहे. बीड ते अहिल्यानगर रेल्वे १७ सप्टेंबरपर्यंत येईल, अशा पद्धतीने काम केले जाणार आहे. विमानतळ प्रश्नावरदेखील केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी बोलणे झाले आहे. डीपीआर तयार केला जाईल, असेही ते म्हणाले.

बीडमधील कायदा, सुव्यवस्थेवर अजितदादा काय म्हणाले?

बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेवरही त्यांनी भाष्य केले. पोलिसांना सांगितले की जो कोणी चुकेल; तो कोणत्याही पक्षाचा असो कायदाच्या माध्यमातून त्याला शिक्षा झाली पाहिजे. कोणी चुकीचे वागत असेल तर त्याला सांगा. शिस्त सर्वांनी पाळली पाहिजे. कोणी ऐकत नसेल तर मोका लावू. मग आतमध्ये जाऊन चक्की पिसिंग अँड पिसिंग करावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

धनंजय मुंडे- सुरेश धस एकाच व्यासपीठावर

दरम्यान, आज पहिल्यांदाच माजी मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर एकाच व्यासपीठावर आले. अजितदादांच्या प्रमुख उपस्थितीत व्यासपीठावर या नेत्यांची उपस्थिती राहिली. बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित ऊसतोड कामगारांच्या मेळाव्याच्या निमित्ताने दोन्ही नेते एकत्र पाहायला मिळाले. याआधी अनेकवेळा सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कृषी घोटाळ्यासह गंभीर आरोप केले होते. आज हे नेते एकाच व्यासपीठावर आले. पण खुर्च्यांमध्ये अंतर राखून बसले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT