Canara Bank robbed of cash worth Rs 18 lakh
बीड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील पाली येथे गुरुवारी पहाटे चोरट्यांनी कॅनरा बँकेत धाडसी चोरी केली. या घटनेत जवळपास अठरा लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली.
बीडच्या पाली गावात मुख्य रस्त्यावर कॅनरा बँकेची शाखा आहे. या ठिकाणी चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास बँकेच्या मागील बाजूची भिंत फोडून आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने लॉकर तोडून रोकड काढून नेली. चोरट्यांनी बँकेमध्ये प्रवेश करताच सायरनचे वायर देखील कट केले. घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चोरट्यांनी वापरलेली साधने व पावलांचे ठसे, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे.
दरम्यान, ज्या पद्धतीने ही चोरी केली ती पाहता हे सर्व सराईत गुन्हेगार असावेत असा संशय व्यक्त केला जात आहे. भिंत फोडून आत प्रवेश केल्यानंतर सर्वात आधी सायरनचे वायर चोरट्यांनी कट केले. त्यानंतर तिजोरी फोडत रक्कम घेवून तेथून काढता पाय घेतला. या परिसरातील सर्व सीसीटीव्ही आता तपासले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.