

Rahul Gandhi interacts with Dr. Sampada Munde's family
वडवणी पुढारी वृत्तसेवा : डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाने राज्यात संतापाचे वादळ उठलेले असतानाच, काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी डॉ. संपदा मुंडे यांच्या पीडित कुटुंबीयांशी थेट दूरध्वनीद्वारे संवाद साधला. "तुम्ही घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत," अशा शब्दांत गांधींनी कुटुंबीयांना दिलासा दिला.
राहुल गांधींनी संभाषणादरम्यान विचारलं, "तुम्हाला आता काय हवं आहे?" यावर कुटुंबीयांनी सांगितलं "या प्रकरणी एसआयटी चौकशी व्हावी आणि दोषींना फाशी द्यावी." राहुल गांधींनी या मागणीला पाठिंबा देत म्हणाले की, "संपदासाठी न्याय मिळेपर्यंत काँग्रेस शांत बसणार नाही." त्यांच्या या आश्वासनाने उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी तरळलं.
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सकाळी कवडगाव येथे डॉ. मुंडे यांच्या कुटुंबीयांना भेट देऊन सांत्वन केले. यावेळी त्यांच्या सोबत युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभान, माजी मंत्री अशोकराव पाटील, युवक काँग्रेस प्रदे-शाध्यक्ष शिवराज मोरे, महिला काँग्रेस अध्यक्षा संध्या सव्वालाखे, उपाध्यक्ष राजेंद्र राख, दत्ता कांबळे, रंगनाथ निकम आदींची उपस्थिती होती.
कुटुंबीयांना भेटून सपकाळ म्हणाले की, "या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत काँग्रेस प्रत्येक पाऊल उचलणार आहे. सरकारमधील काही मंडळी आरोपींना संरक्षण देत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शांत डोक्याने क्लीन चिट देऊन गुन्हेगारीला प्रोत्साहन देत आहेत. हेच शांत डोकं गोडसेचं होतं, आणि आज तेच धोरण सत्तेतील मंडळी अवलंबत आहेत," अशी जळजळीत टीका त्यांनी केली.
सपकाळ पुढे म्हणाले, "स्वारगेट असो, केंद्रीय मंत्र्यांच्या मुलींची छेडछाड असो हे सरकार बेजबाबदार, असंवेदनशील आणि स्त्रियांच्या सुरक्षेबाबत निष्क्रिय आहे. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात आका असणाऱ्यांना राजकीय आश्रय देण्यात येत आहे. आम्ही या प्रकरणात एसआयटी चौकशीसह तपासप्रमुख म्हणून एका महिला आयपीएस अधिकाऱ्याची नेमणूक करावी आणि प्रकरण बीड न्यायालयात वर्ग करावे, अशी मागणी करतो."
दिल्लीतही काँग्रेसचे आंदोलन सुरू: या प्रकरणावर राहुल गांधींनी ट्विटरद्वारे प्रतिक्रिया देत तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीतील जंतर-मंतरवर युवक काँग्रेसने आंदोलन सुरू केले असून, "राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ राजीनामा द्यावा" अशी मागणी करण्यात आली आहे. ही माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.
"संपदा मुंडे यांचा मृत्यू हा फक्त एका तरुणीचा अंत नाही, तो या व्यवस्थेच्या संवेद-नशून्यतेचा आरसा आहे. मी कुटुंबाला सांगितलं आहे, घाबरू नका, आम्ही तुमच्या न्यायाच्या लढ्यात खंबीर आहोत. ही लढाई फक्त बीडची नाही, ही भारतातील प्रत्येक स्त्रीच्या सन्मानाची लढाई आहे."