भगवानगडाच्या महंतपदी विराजमान झाल्‍यानंतर कृष्णा महाराज शास्त्री यांना पुष्‍पहार अर्पण करताना महंत डॉ. नामदेव महाराज शास्‍त्री. pudhari photo
बीड

Bhagwan Gad Mahant: तेलंगणात जन्‍म, अध्यात्‍माकडे ओढ, भगवानगडावर शिक्षण, कोण आहेत गडाचे चतुर्थ महंत कृष्‍णा महाराज शास्त्री?

संत भगवानबाबांच्या विचारांचा वारसा आणि गुरुपरंपरेतील संस्कार जपत कृष्णा महाराज आता भगवानगडाची आध्यात्मिक परंपरा पुढे नेणार

पुढारी वृत्तसेवा

उदय नागरगोजे
बीड : संत भगवानबाबांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या तेलंगणातील एका शेतकरी कुटुंबातील मुलगा दसर्‍याला भगवानगडाच्या महंतपदावर विराजमान झाला आहे. तेलंगणातील गुडीहत्नूर परिसरातील जायभाय कुटुंबातील कृष्णा महाराज शास्त्री यांची भगवानगडाच्या चतुर्थ महंतपदी निवड झाली आहे. संत भगवानबाबांच्या विचारांचा वारसा आणि गुरुपरंपरेतील संस्कार जपत कृष्णा महाराज आता भगवानगडाची आध्यात्मिक परंपरा पुढे नेणार आहेत.

कृष्णा महाराज शास्त्री यांचा जन्म तेलंगणातील गुडीहत्नूर येथे शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील उद्धवराव जायभाय आणि आई गिरिजाबाई हे शेती व्यवसाय करतात. तीन भावंडांमध्ये कृष्णा महाराज सर्वांत लहान आहेत. ग्रामीण वातावरणात वाढलेल्या कृष्णा महाराज यांच्या मनात लहानपणापासूनच भक्ती, अध्यात्म आणि संतविचारांविषयी ओढ निर्माण झाली. विठ्ठलभक्ती, वारकरी संप्रदायाची शिकवण आणि संत ज्ञानेश्वरांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी  श्री क्षेत्र भगवानगड गाठले.

अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यांच्या सीमाभागात असलेल्या भगवानगडावर त्यांनी श्री ज्ञानेश्वरी विद्यापीठात वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार अध्ययन केले.  संस्थानाचे तिसरे महंत डॉ. न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सुमारे बारा वर्षे गुरुकुल पद्धतीने अभ्यास आणि साधना केली. संस्कृत, वेदांत तसेच वारकरी संप्रदायाचा आधारस्तंभ असलेल्या संत ज्ञानेश्वरी ग्रंथाचा सखोल अभ्यास करून त्यांनी ‘शास्त्री’ ही पदवी प्राप्त केली. यासोबतच त्यांनी एम.ए.चे उच्च शिक्षणही पूर्ण केले.

अध्यात्मासोबत समाजप्रबोधनाचे कार्य
अध्ययन पूर्ण झाल्यानंतर कृष्णा महाराज यांनी पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथील श्री क्षेत्र निरंजन संस्थानाचे महंत म्हणून जबाबदारी सांभाळली. ज्ञानेश्वरी प्रवचने, कीर्तन आणि व्यसनमुक्तीच्या प्रसारासोबतच गोसंरक्षणाच्या कार्यातही त्यांनी सहभाग घेतला. अध्यात्म, अभ्यास, साधना आणि सेवाभाव यांच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागात धार्मिक व सामाजिक प्रबोधनाचे कार्य केले.त्यांची अभ्यासू वृत्ती, शांत स्वभाव, संयम आणि वैराग्य पाहून गुरु महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनी भगवानगड संस्थानाच्या पुढील महंतपदासाठी त्यांची निवड केली. आता भगवानगडाच्या समृद्ध आध्यात्मिक परंपरेचे जतन करत ज्ञानदान, अन्नदान आणि ज्ञानेश्वरीच्या प्रचार-प्रसाराची जबाबदारी कृष्णा महाराज शास्त्री यांच्यावर असेल.

भगवानबाबांच्या विचारांचा कुटुंबावर प्रभाव
संत भगवानबाबा त्या काळात तत्कालीन आंध्र प्रदेशातील, आताच्या तेलंगणा राज्यातील गुडीहत्नूर, दिगनूर आणि मगनूर परिसरात कीर्तनासाठी जात असत. त्यांच्या कीर्तनातून मांडले जाणारे विचार जायभाय कुटुंबावर प्रभाव टाकणारे ठरले. पुढे महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री हेही या परिसरात कीर्तनासाठी जात असत. त्यांचे विचार ऐकून प्रभावित झालेल्या कृष्णा महाराज यांनी भगवानगडावर येऊन आध्यात्मिक शिक्षणाचा मार्ग स्वीकारला. तेथून सुरू झालेला त्यांचा प्रवास आता भगवानगडाच्या महंतपदापर्यंत पोहोचला आहे.

संत भगवानबाबा, महंत भीमसिंह महाराज आणि डॉ. नामदेव शास्त्री यांनी गडाचा नावलौकिक वाढवला. त्यांनी सुरू केलेली परंपरा पुढे चालवायची आहे. ज्ञानेश्वरीचा प्रचार आणि प्रसार हा माझा मुख्य उद्देश आहे. गडावरील बांधकामाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे यापुढे ज्ञानदान आणि अन्नदान या कार्याला प्राधान्य देणार आहे. भगवानगडाच्या परंपरेनुसार मार्गक्रमण करताना गुरुआज्ञा शिरसावंद्य मानून कार्य करणार आहे.
कृष्णा महाराज शास्त्री
कृष्णा महाराज शास्त्री शांत, संयमी, वैराग्यशील असून त्यांचा अभ्यासही चांगला आहे.
महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT