Beed Zilla Parishad Inquiry pudhari photo
बीड

Beed Zilla Parishad Inquiry : बीड जिल्हा परिषदेच्या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी!

आर्थिक गैरव्यवहारांच्या तक्रारी; छत्रपती संभाजीनगरच्या सीईओंचे २५ नोव्हेंबरपर्यंत मूळ संचिका सादर करण्याचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

आष्टी : नियमबाह्य पदोन्नती, मर्जीतील अधिकाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार, निलंबित कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती, दिव्यांग आरक्षणातील अनियमितता आणि कोट्यवधींच्या निधी गैरव्यवहाराच्या आरोपांनी चर्चेत आलेल्या बीड जिल्हा परिषदेच्या कारभाराची आता उच्चस्तरीय चौकशी सुरू झाली आहे.

या प्रकरणातील तक्रारींची दखल घेत चौकशी अधिकारी तथा छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पी. एम. मिन्नू यांनी बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून संबंधित सर्व मूळ अभिलेखे आणि संचिका २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत प्रत्यक्ष सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

आष्टी तालुक्यातील करेवाडी येथील तक्रारदार राम सूर्यभान खाडे यांनी १९ मे, २६ मे आणि १ ऑक्टोबर २०२६ रोजी शासन व विभागीय आयुक्तांकडे विविध पुराव्यांसह तक्रारी दाखल केल्या होत्या. यामध्ये बांधकाम व ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील रिक्त पदांचा अतिरिक्त कार्यभार कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपविणे, बीड, आष्टी, पाटोदा व गेवराई पंचायत समित्यांमध्ये गटविकास अधिकारी पदांचा कार्यभार नियमबाह्य पद्धतीने देणे, तसेच निलंबित आणि एसीबीच्या कारवाईला सामोरे गेलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा प्रतिनियुक्ती देण्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

शिक्षण विभागातील पदोन्नती प्रक्रिया, न्यायालयीन प्रकरणे प्रलंबित असतानाही काढलेले आदेश, दिव्यांग आरक्षणातून झालेल्या नियुक्त्यांची अपुरी पुनर्तपासणी आणि स्वातंत्र्यसैनिक पाल्य कोट्यातील कथित बोगस नियुक्त्यांचाही तक्रारीत समावेश आहे. विशेष म्हणजे, दिव्यांग आरक्षणातून नियुक्त झालेल्या सुमारे दीड हजार शिक्षकांपैकी केवळ २०० जणांचीच वैद्यकीय पुनर्तपासणीसाठी यादी पाठविण्यात आल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे.

स्वच्छ भारत मिशनच्या निधी वितरणात पदभार बदलल्यानंतरही जुन्या लॉगिन आयडी व डिजिटल स्वाक्षरीचा वापर केल्याचा आरोप, तसेच धारूर तालुक्यातील हंगामी वसतिगृहांमध्ये विद्यार्थी संख्या वाढवून दाखवत कोट्यवधींची बिले उचलल्याची तक्रारही चौकशीच्या केंद्रस्थानी आहे. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बजावलेल्या ३० पेक्षा अधिक कारणे दाखवा नोटिसा आणि त्यावरील कारवाई दडपल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

यापूर्वी झालेल्या सुनावणीत जिल्हा परिषदेच्या खुलाशातून अनेक मुद्द्यांवर समाधानकारक स्पष्टता न मिळाल्याने आता मूळ संचिका मागविण्यात आल्या आहेत. त्यामुळे केवळ खुलाशांपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष कागदपत्रांच्या आधारे या प्रकरणाची पडताळणी होणार आहे.२५ नोव्हेंबरला कोणती कागदपत्रे सादर होतात, कोणत्या अधिकाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात येते आणि कोट्यवधींच्या कथित गैरव्यवहारामागील सत्य काय, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT