Vilas Ghule murder case pudhari photo
बीड

Vilas Ghule murder case : विलास घुले यांच्या पत्नीने प्राशन केले विष

दहा दिवसांपासून आंदोलन; प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

बीड : केज तालुक्यातील टाकळी येथील स्व. विलास घुले खून प्रकरणात आरोपींवर कारवाई करावी या मागणीसाठी दहा दिवसांपासून उपोषण करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटूंबीयांच्या या उपोषणाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत स्व. विलास घुले यांच्या पत्नी सुषमा घुले यांनी शुक्रवारी दुपारी विष प्राशन केले.

यावेळी पोलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. तर दुसरीकडे आरोपींना अटक होईपर्यंत उपोषण सुरुच ठेवणार असल्याचे रमेश घुले यांनी सांगितले.

केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले यांचा 21 जून रोजी चाकुचे वार करुन खून करण्यात आला होता. या प्रकरणात रमेश घुले यांनी दिलेल्या पुरवणी जवाबामध्ये खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरव सोनवणे याचे नाव समोर आले होते. त्याला अटक करावी अशी मागणी घुले कुटूंबीयांनी यापूर्वी देखील केली होती. या मागणीनंतर सौरव सोनवणे याची चौकशी झाली, परंतु अटक मात्र करण्यात आलेली नव्हती. याच मुद्यावर घुले कुटूंबीयांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.

गेल्या दहा दिवसांपासून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटूंबीय उपोषणाला बसले आहेत. यामध्ये विलास घुले यांचे भाऊ रमेश घुले, त्यांच्या आई व विलास घुले यांच्या पत्नी सुषमा घुले या सहभागी आहेत. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला असून तेच या प्रकरणात कारवाई करत असल्याचे बीड पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तर गुरुवारी रात्री सीआयडीच्या एका अधिकाऱ्याने देखील या कुटूंबाची भेट घेतली. परंतु आरोपींना अटक करेपर्यंत माघार घेणार नाही, असा पावित्रा घुले कुटूंबीयांनी घेतला आहे.

शुक्रवारी पालकमंत्री सुनेत्रा पवार या बीडमध्ये दाखल होण्यापूर्वीच सुषमा घुले यांनी एका माध्यम प्रतिनिधीशी संवाद साधत असतांना अचानकपणे विष प्राशन केले. यावेळी उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

पालकमंत्र्यांच्या भेटीसाठी नातेवाईक आक्रमक

पालकमंत्री सुनेत्रा पवार या बीडच्या शासकीय विश्रामगृहात थांबलेल्या असतांना त्याच्या समोरच असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हे आंदोलन सुरु होते. यावेळी आंदोलकांनी शासकीय विश्रामगृहाच्या गेटबाहेर थांबून भेट घेण्याची मागणी केली. परिस्थिती लक्षात घेवून मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. जवळपास अर्धा तास हा सर्व प्रकार सुरु होता. यानंतर पोलिसांनी पालकमंत्र्यांशी भेट घडवून आणण्याबाबत सकारात्मकता दर्शवल्यानंतर आंदोलकांनी माघार घेतली.

ताफा वेगळ्याच रस्त्याने नेला

बीडच्या शासकीय विश्रामगृहातून पालकमंत्री पवार यांना एका कार्यक्रमासाठी जायचे होते. तर समोरच्या बाजुला घुले कुटूंबीयांच्या आंदोलन सुरु होते. त्या ठिकाणी नातेवाईक आक्रमक झालेले असल्याने सुनेत्राताई पवार यांचा ताफा नगर नाका येथून परत छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे न आणता वेगळ्याच मार्गाने सहयोगनगर भागात नेण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT