स्वातंत्र्य म्हणजे काय रे भाऊ?

What is Freedom- स्वातंत्र्य म्हणजे काय रे भाऊ?
What is Freedom
What is Freedom
Published on
Updated on

“अरे, चार लोकांत कसंही वागायचं, रस्त्यावर, बागेत, सार्वजनिक ठिकाणी काहीही करायचं! मला कोण अडवणार? मला हवं ते मी करणार यालाच तर माझ्या मते म्हणतात स्वातंत्र्य!” स्वातंत्र्याची हीच व्याख्या मनाशी पक्की केली, तर मग नदीत कचरा टाकताना, रस्त्यावर गाडी आडवी लावून गप्पा मारताना किंवा वाहतुकीचे नियम मोडताना कुणी टोकले, की उत्तरही तयारच असते, “तुझे काय जाते? ही नदी तुझी आहे का? मी काहीही करीन!”

वाहतुकीचे नियम? रस्त्यावर पाहा एकदा! मोबाईलवर बोलत वाहन चालवणे, चुकीच्या ठिकाणी गाडी पार्क करून निवांत निघून जाणे, रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवून गप्पांचा फड रंगवणे, किंवा एक्सप्रेसवेवर फ़ास्ट लेनमध्ये ट्रक हळूहळू हाकत मागच्या वाहनांची रांग लावणे, हे म्हणजे स्वातंत्र्य!

हॉर्न? कारणाची गरज नाही; धार्मिक कार्यक्रम असो की वाढदिवस-रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात ढणढण संगीत, रांगेत मधे घुसणे, सार्वजनिक जागा अडवणे, भिंती विद्रूप करणे हे तर जणू आपल्या स्वातंत्र्याचेच हक्क!

“माझी सोय” जेव्हा “दुसऱ्याचा त्रास” बनते, तेव्हा ते स्वातंत्र्य राहत नाही; तो बेजबाबदारपणाचा परिपाक असतो. परदेशी पर्यटक भारतात येतात तेव्हा आपल्या सार्वजनिक ठिकाणची अस्वच्छता आणि बेशिस्ती पाहून ते आश्चर्यचकित होतात. तेव्हा आपल्याला स्वतःलाच प्रश्न पडायला हवा. “आपण सार्वजनिक स्वच्छता आणि शिस्त इतक्या सहज का विसरतो?”

What is Freedom
Lotus Flower |कमळाच्या बियांची आपले सजीवत्व टिकून धरण्याची क्षमता किती असेल?

आपल्या समाजात स्वच्छता, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी जपणारे असंख्य लोक आहेत. पण केवळ काही जणांनी शिस्त पाळून भागणार नाही; ही जाणीव सार्वजनिक जीवनाचा स्वभाव बनायला हवी. शाळेत शिकलेली “भारत माझा देश आहे” ही प्रतिज्ञा आपण अभिमानाने म्हणतो; पण प्रत्यक्ष आयुष्यात भारताशी आपले नाते अनेकदा फायदा मिळतो तेव्हा ‘माझा देश’, आणि जबाबदारीची वेळ आली की ‘सरकारचे काम’ इतकेच उरते.

आपल्या देशाला स्वातंत्र्य सहज मिळालेले नाही. असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी त्यासाठी त्याग केला, तुरुंगवास भोगला, रक्त सांडले. त्या स्वातंत्र्याचा अर्थ “मला वाटेल तसे वागण्याचा अधिकार” एवढाच असू शकत नाही. स्वातंत्र्याला जबाबदारीची जोड असेल, तरच त्याचे सौंदर्य टिकते. याच संदर्भात आफ्रिकेतील ‘उबुंटू’ ही संकल्पना मनाला स्पर्श करते. तिचा सुंदर अर्थ आहे—“I am because we are.” : “मी आहे, कारण आपण आहोत.”

उबुंटूची भावना समजून घेण्यासाठी एक सुंदर गोष्ट सांगितली जाते. एका आफ्रिकन गावात एका मानववंशशास्त्रज्ञाने मुलांसाठी चॉकलेटची टोपली आणली. त्यांनी मुलांना सांगितले, “मी तीन मोजल्यावर धावा. झाडाजवळ जो पहिला पोहोचेल, त्याला सारी चॉकलेट्स मिळतील.”

शर्यत सुरू झाली. पण मुलांनी एकमेकांचे हात धरले आणि सगळे मिळून झाडाकडे धावले. सर्वजण एकाच वेळी पोहोचले आणि त्यांनी चॉकलेट्स आपापसात वाटून घेतली. आश्चर्यचकित झालेल्या त्या शास्त्रज्ञाने विचारले, “तुमच्यापैकी एकट्याने धावून सगळी चॉकलेट्स जिंकली असती. मग असे का केले?”

What is Freedom
सद्गुरूंच्या चरणी मनापासून समर्पित का व्हावे? वाचा कथा

एका मुलीने हसत उत्तर दिले-“उबुंटू! बाकीचे दुःखी असताना मी एकटी कशी काय सुखी होऊ शकते? माझे सुख हे केवळ माझे नसते; ते माझ्या आसपासच्या माणसांशी जोडलेले असते.” सर्व भारतीय नागरिकांच्या मनात आज “दुसऱ्याच्या अवकाशाचा, हक्कांचा आणि आनंदाचा आदर करत जगावे” ही भावना रुजण्याची गरज आहे. स्वातंत्र्याची खरी सुंदरता ‘मी’ जपत असतानाच ‘आपण’ही जपण्यात आहे, नाही का?

आपल्या सार्वजनिक जीवनात स्वच्छता, शिस्त, परस्परांचा आदर आणि जबाबदारीची ही जाणीव रुजली, तर आपल्याच परदेशी गेलेल्या लोकांना भारतात पुन्हा यावेसेही वाटेल. “हा देश केवळ प्राचीन संस्कृतीचा नाही, तर जबाबदार आणि जागरूक नागरिकांचाही देश आहे,” असे जग म्हणू लागेल.

सर्वांना हवाहवासा वाटणारा भारत घडवणे हे स्वप्न नाही; ते आपल्या सर्वांच्या हातात आहे. आजच्या स्वातंत्र्यदिनी, आपण स्वतःपासून सार्वजनिक शिस्त, परस्परांचा आदर आणि सामाजिक जबाबदारीची सुरुवात करूया. ‘मी’ जपत असतानाच ‘आपण’ जपूया. मग आपल्या स्वातंत्र्याला खरा अर्थ मिळेल आणि आपल्या भारतालाही नवे रूप!

- सौ. अनुराधा चंद्रशेखर भडसावळे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news