on-in-law donkey ride Pudhari
बीड

Donkey Ride Holi |"यंदा कोणाचा नंबर ? बीडच्या विडा गावात पुन्हा रंगणार 'जावयाची गाढवावरून मिरवणूक'; जाणून घ्या 'या' अनोख्या परंपरेबद्दल

Beed Holi | बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा गावात धुळवडीला निघणाऱ्या ‘जावयाच्या गर्दभ स्वारी’ची परंपरा पुन्हा एकदा रंगणार

पुढारी वृत्तसेवा

Son-in-law donkey ride Vida Beed

गौतम बचुटे

केज : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा गावात धुळवडीला निघणाऱ्या ‘जावयाच्या गर्दभ स्वारी’ची परंपरा पुन्हा एकदा रंगणार असल्याने गावातील जावयांची धाकधूक वाढली आहे. गेल्या काही वर्षांत दोनदा खंडित झालेली ही दीडशे वर्षांची परंपरा यंदा पुन्हा जोमात साजरी करण्याची तयारी सुरू झाली असून, जावयांच्या शोधासाठी तरुणांची पथके रवाना झाली आहेत.

परंपरेमागची रंजक कहाणी

गावचा जावई म्हणजे सगळ्या गावाचा जावई—असा मानाचा समज. सामान्यतः सासरवाडीत जावयाचे मोठ्या आदरातिथ्याने स्वागत केले जाते. मात्र विडा येथे चित्र अगदी उलटे आहे. धुळवडीच्या दिवशी जावयाला चक्क गाढवावर बसवून, गळ्यात चपलांचा हार घालून, डीजेच्या तालावर वाजतगाजत मिरवणूक काढली जाते.

या परंपरेची सुरुवात अंदाजे १९१५ च्या सुमारास झाल्याचे सांगितले जाते. त्या वेळी गावातील जहागीरदार आनंदराव देशमुख यांचे मेहुणे धुळवडीला विडा येथे आले होते. थट्टा-मस्करीत त्यांची गाढवावरून काढलेली मिरवणूक गावाची परंपरा बनली. काहींच्या मते ही परंपरा ९०-९५ वर्षांची, तर काहींच्या मते तब्बल १५० वर्षांपासून जपली जात आहे.

दोनदा लागला ब्रेक

या रंगतदार परंपरेला दोनदा खंड पडला. २०२१ मधील कोरोना लॉकडाऊनमुळे पहिला ब्रेक बसला. त्यानंतर ९ डिसेंबर २०२४ रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या पार्श्वभूमीवर विडा ग्रामस्थांनी देशमुख कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत गेल्या वर्षी गर्दभ स्वारी रद्द केली. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा परंपरा थांबली होती.

यंदा पुन्हा तयारी जोरात

यंदा मात्र परंपरा कायम ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. जावयांच्या शोधासाठी गावातील तरुणांची पथके विविध भागांत रवाना झाली आहेत. “जावई सापडेपर्यंत परतायचे नाही,” असा निर्धार त्यांनी केला आहे. त्यामुळे काही जावई ‘भूमिगत’ झाल्याची चर्चा असून, काहींनी मुक्कामच बदलल्याचेही सांगितले जाते.

बक्षीस:

मिरवणूक मारुती मंदिरात संपल्यानंतर, सासरच्या मंडळींकडून आणि ग्रामस्थांकडून जावयाला नवीन कपडे आणि सोन्याची अंगठी किंवा इतर मौल्यवान वस्तू भेट दिली जाते.

जावयांना पकडण्याच्या गमतीशीर कथा

गेल्या काही वर्षांत जावयांना पकडण्यासाठी गावकऱ्यांनी वेगवेगळ्या युक्त्या लढवल्या आहेत.

  • २०२० : धुळवडीच्या दिवशी मटण खरेदीसाठी आलेल्या दत्तात्रय गायकवाड यांना तरुणांनी बसस्थानकावरूनच ‘उचलून’ आणले.

  • २०२२ : बँकेत कार्यरत असलेल्या अमृत धनंजय देशमुख यांना ताब्यात घेऊन त्यांना गर्दभ स्वारीचा ‘मान’ देण्यात आला.

  • २०२३ : “दारात साप निघाला” असा बनाव करून अविनाश करपे यांना घराबाहेर बोलावण्यात आले आणि त्यांना पकडण्यात आले.

  • २०२४ : एका जावयाने गावकऱ्यांना गुंगारा देत पलायन केले; दुसऱ्या वकील जावयाने युक्तिवाद करून सुटका करून घेतली; तर तिसऱ्याला चहा पिताना पकडण्यात आले—अशा थरारक घडामोडी घडल्या.

परंपरेचा उत्साह कायम

थट्टा-मस्करीतून सुरू झालेली ही परंपरा गावाच्या सांस्कृतिक ओळखीचा भाग बनली आहे. जावयांनाही सुरुवातीला नाही, होय म्हणत या सोहळ्यात सहभागी व्हावे लागते. यंदा ब्रेकनंतर पुन्हा रंगणाऱ्या गर्दभ स्वारीमुळे विडा गावात उत्साहाचे वातावरण आहे; मात्र जावयांची धडधड वाढली आहे, हेही तितकेच खरे!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT