Holi festival Indian culture | अनिष्ट ज्वलनाची होळी

Holi festival Indian culture |
Holi festival Indian culture | अनिष्ट ज्वलनाची होळी
Published on
Updated on

सु. ल. हिंगणे

होळी हा रंगांचा उत्सव आहे. होळीच्या आगीत अनिष्ट गोष्टी जळून जातात, दुःखे नाहीशी होतात आणि रंगांमध्ये भरलेला आनंद जीवनात उतरतो, अशी या सणाची महती आहे.

होळी हा केवळ रंगांचा सण नव्हे, तर भारताची संस्कृती आणि रितीरिवाजाशी जोडलेला हा सण आहे. ग्रामीण भागात विशेषतः उत्तर भारतातील गावांत अर्धेकच्चे धान्य आगीत भाजून खाण्याचा रिवाज आहे. त्या धान्याला ‘होला’ असे म्हटले जाते. जाणकार असे सांगतात की, नवधान्य सस्येष्टीचा हा सण आहे. या शब्दाचा अर्थ ‘नवे धान्य किंवा पिकाचे हवन’ असा आहे. वैदिक काळात याला ‘नवान्नसस्येष्टी यज्ञ’ असे म्हटले जात असे. नव्याने तयार झालेले कच्चे धान्य यज्ञात दान करून प्रसाद म्हणून ग्रहण केले जात असे. याच धान्याला ‘होला’ असे म्हटले जात असल्यामुळे या सणाला ‘होलिकोत्सव’ असे नाव देण्यात आल्याचे सांगितले जाते. आता मात्र हा पूर्णपणे रंगांचा सण होऊन गेला आहे. केवळ भारतातच नव्हे, तर भारताबाहेरसुद्धा या दिवशी एकत्र येऊन मोठ्या उत्साहानं होळी साजरी करतात.

होलिका दहनाच्या दुसर्‍या दिवशी होळी खेळली जाते. या दिवसाला धुळवड किंवा धूलिवंदन असे म्हणतात. यावेळी घरोघरी जाऊन एकमेकांना रंग लावला जातो. वसंताच्या आगमनाचे निदर्शक म्हणजे होळी. निसर्गही या काळात वेगवेगळ्या रंगांची उधळण करीत असतो. होळीचे एक प्रचलित नाव फाल्गुनी हेही आहे. वसंत पंचमीपासून हा उत्सव सुरू होतो. वर्षाचा अखेरचा सण असला, तरी नव्याची चाहूल लागल्यामुळे सर्वांच्या मनात उत्साहाचे वातावरण असते. जैमिनीच्या पूर्वमीमांसा सूत्रात आणि कथाग्राह्य सूत्रात होलिकेचा उल्लेख आढळतो.

होळीच्या अनेक अंतर्कथा आहेत. सर्वांत प्रसिद्ध आणि जुनी कहाणी प्रल्हादाची आहे. हिरण्यकश्यपू नावाचा असुर स्वतःला ईश्वर मानू लागला. त्याचा पुत्र प्रल्हाद हा ईश्वरभक्त होता. विष्णूची पूजा न करण्याबाबत त्याने अनेकदा प्रल्हादाला सुनावले. कठोर शिक्षा देऊनसुद्धा काही उपयोग झाला नाही. हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला मारण्यासाठी आपल्या बहिणीची म्हणजे होलिकेची मदत घेतली. होलिकेला शंकराकडून वरदान प्राप्त होते. होलिकेने प्रल्हादाला मांडीवर घेतले आणि आगीत जाऊन बसली; परंतु चादर तिच्या अंगावरून निसटून प्रल्हादाच्या अंगावर येऊन पडली आणि प्रल्हादाऐवजी होलिका जळून गेली. ईश्वरभक्त प्रल्हादाच्या स्मृतिप्रीत्यर्थ या दिवशी होळी पेटविली जाते. छळ आणि अत्याचाराचे प्रतीक असणारी होळी जळते आणि प्रेमाचे प्रतीक असणारा प्रल्हाद म्हणजे आनंद अक्षय्य राहतो. श्रीकृष्णाने या दिवशी पुतना नामक राक्षसिणीचा वध केला होता, असेही मानले जाते. याच आनंदात गोप-गोपिकांनी रासलीला आणि रंग खेळला होता.

होळीच्या पर्वाच्या पहिल्या दिवशी होळी पेटविली जाते. नव्याने आलेले पीक विशेषतः गहू आणि हरभरा त्यात भाजला जातो. होळीचे दहन हे समाजातील सर्व वाईट वृत्तींचे दहन मानले जाते. दुसर्‍या दिवशी गुलाल आणि रंगांच्या साह्याने होळी खेळली जाते. ब—जभूमीतील होळी जगप्रसिद्ध आहे. मथुरा आणि वृंदावन येथे पंधरा दिवस होळीचा उत्सव रंगतो. वृंदावन येथे विधवा महिला मंदिरांमध्ये जाऊन श्रीकृष्णाबरोबर होळी खेळतात. दक्षिण गुजरातमधील आदिवासीबहुल भागात होळी महत्त्वाचा सण आहे. छत्तीसगडमध्ये खास लोकगीते गायिली जातात. मध्य प्रदेशात माळवा प्रांतात भगोरिया आदिवासी भागात तसेच बिहारमधील फगुआमध्ये होळीचा उल्हास पाहायला मिळतो. लोक दुःख विसरून होळीचा सण साजरी करतात. आनंदात नाचतात. परदेशातील लोकांनाही या सणाची गोडी लागली आहे. आपले हे सांस्कृतिक वैभव आज जगभरात पोहोचले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news