

Holi 2026 lunar eclipse Premanand Maharaj remedies:
मथुरा: यंदा १०० वर्षानंतर होळी आणि चंद्रग्रहण असा दुर्मिळ योग जुळून येत असल्याने भक्तांच्या मनात धाकधूक आहे. ३ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळात काय करावे, याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न आहे. यावर प्रेमानंद महाराज यांनी उपाय सांगितले आहेत.
ग्रहणाबाबत लोकांच्या मनात असलेल्या भीतीवर भाष्य करताना महाराज म्हणाले की, "ग्रहणाला घाबरण्याची गरज नाही, तर सावध राहण्याची गरज आहे." त्यांच्या मते, ग्रहण काळात वातावरणात नकारात्मक ऊर्जा वाढते. यापासून वाचण्यासाठी 'नामजप' हाच सर्वात प्रभावी उपाय आहे. आपल्या इष्ट देवतेचे नाव, गुरुमंत्र किंवा गायत्री मंत्राचा जप केल्यास अशुभ प्रभावांचा स्पर्शही होत नाही. हा जप केवळ भीती घालवत नाही, तर एकाग्रताही वाढवतो.
महाराजांनी केवळ ग्रहणादरम्यानच नव्हे, तर त्यापूर्वीचीही नियमावली सांगितली आहे. ग्रहण सुरू होण्यापूर्वी साधारण एक तास आधी स्नान करावे. स्वच्छ वस्त्र परिधान करून घरातील शांत जागी किंवा देवघरात आसन घालून बसावे. स्वतःला पूर्णपणे ईश्वराच्या नामात झोकून द्यावे. अशा मानसिक स्थितीमुळे नकारात्मक ऊर्जेचा कोणताही परिणाम शरीरावर होत नाही.
ग्रहण संपले की लगेच कामाला लागू नका, असा सल्ला महाराजांनी दिला आहे. ग्रहण सुटल्यानंतर किमान अर्धा तास जप सुरू ठेवावा. त्यानंतर पुन्हा एकदा स्नान करूनच भोजन करावे किंवा इतर सांसारिक कामे करावीत. मन आणि शरीर दोन्हीच्या शुद्धीसाठी हे अत्यंत आवश्यक आहे.
यंदाचे चंद्रग्रहण विशेष मानले जात आहे, कारण ३ मार्च २०२६ रोजी 'होलिका दहन' देखील आहे. हे ग्रहण सिंह राशीत लागणार आहे. आध्यात्मिक दृष्टीने हा काळ साधना करण्यासाठी अत्यंत फलदायी मानला जातो. नकारात्मकता नष्ट करून सकारात्मकतेकडे जाण्याची ही मोठी संधी असल्याचे महाराज सांगतात.
भारतीय प्रमाण वेळेनुसार, हे चंद्रग्रहण दुपारी ३:२० वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी ६:४७ पर्यंत चालेल. सुतक काळ सकाळी ९:३९ वाजता सुरू होईल आणि ग्रहण संपेपर्यंत, म्हणजेच संध्याकाळी ६:४६ पर्यंत राहील.